Last Updated on 13 Dec 2025 10:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर | भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरण करण्यासाठी लागू असलेल्या नियमांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, सुधारित नियम आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत आणि विधानसभेत या विषयावर निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रुपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असलेली मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यास मंजुरी मिळाली. हे रुपांतरण सवलतीच्या दराने करता येणार असून न्यायालयीन व प्राधिकरणीय कारणांमुळे विलंब झाल्यास सवलत मिळणार आहे.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, न्यायालयीन प्रकरणे, नियोजन प्राधिकरणाचे बदल किंवा भोगवटादाराच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे जमिनीचा विहित वापर पाच वर्षात करता न आल्यास, शासन पुढील अटी पूर्ण झाल्यास पाच वर्षांच्या वापराची अट शिथील करू शकते— जमीन किमान दहा वर्षांपूर्वी प्रदान केलेली असावी. पाच वर्षांपर्यंत प्रयोजन बदल करता येणार नाही. प्रयोजन बदलावयाचा असल्यास शासनाची मान्यता व अधिमूल्य भरावे लागेल. नियोजन प्राधिकरणाचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
बृहन्मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलासा
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, मुंबईतील अनेक दशके जुन्या शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणे अत्यंत कठीण झाले होते. पीएमएवाय अंतर्गत मिळणाऱ्या वाढीव एफएसआय मधील २५ टक्के एफएसआय शासनाला देण्याची अट असल्याने या संस्थांना योजना लाभदायक ठरत नव्हती. हे वास्तव विचारात घेऊन स्वयं-पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पीएमएवाय च्या वाढीव एफएसआय तील २५ टक्के देण्याची अट वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयांमुळे वर्ग-२ ते वर्ग-१ रुपांतरण प्रक्रियेला गती मिळेल, न्यायालयीन/प्राधिकरणीय कारणांमुळे अडकलेली प्रकरणे मार्गी लागतील, तर मुंबईतील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं-पुनर्विकासास मोठा दिलासा मिळणार आहे.
महसूल विभागाच्या जमीन नियमांमध्ये केलेले हे बदल नागरिक, सहकारी संस्था आणि भूधारकांसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Dec 2025 11:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit 🔸कोणत्या राशीसाठी संधी, कोणासाठी सावधगिरी, जाणून घ्या 🔸आठवड्याची सुरुवात कशी करावी? ग्रह काय सुचवतात 🔸शुभ दिवस, रंग आणि उपाया... Read more













































































