- बहे (ता. वाळवा) येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद कुलकर्णी यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून परिसराचे मन सुन्न झाले. परिसरातील अनेक कुटुंबांचे फॅमिली डॉक्टर, समाजातला एक संवेदनशील चेहरा डॉ. प्रमोद कुलकर्णी यांच्या आकस्मिक निधनाने असाच एक नि:शब्द धक्का बसला आहे. नेहमी हसतमुख, शांत, संयमी आणि आपल्या रुग्णांशी आपुलकीने वागणारे डॉक्टरसाहेब आज आपल्यात नाहीत, ही गोष्ट पटतच नाही.
डॉक्टर प्रमोद कुलकर्णी यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. डॉक्टरसाहेब म्हणजे नेहमी हसतमुख, शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या दवाखान्यात पाऊल ठेवताच एक वेगळा दिलासा मिळायचा. आजारी माणसाला सर्वात आधी गरज असते ती मानसिक आधाराची, विश्वासाची आणि आश्वासकतेची. आणि डॉक्टरसाहेबांचे बोलणे म्हणजे औषधांआधी मिळणारा मानसिक आधार असायचा. ‘घाबरू नका, सगळं ठीक होईल,’ त्यांच्या या दोन शब्दांत एवढी ऊब आणि आत्मविश्वास भरलेला असायचा, की अर्धा आजार तिथेच बरा झाल्यासारखं वाटायचं.
डॉक्टरसाहेब फक्त स्टेथोस्कोपमधून धडधड ऐकणारे नव्हते, तर माणसाच्या अंतर्मनातली वेदना समजणारे होते. त्यांचं बोलणं म्हणजे औषध, आणि उपस्थिती म्हणजे विश्वास!
त्यांची आणि रुग्णांची नाळ नुसती व्यावसायिक नव्हती, ती माणुसकीच्या धाग्याने जोडलेली होती. प्रत्येक रुग्णाला ते केवळ ‘केस’ म्हणून न पाहता, कुटुंबातील सदस्य मानून काळजी घेत. त्यांच्या उपचारात केवळ वैद्यकीय ज्ञान नव्हते, तर नितांत प्रेम आणि आपुलकी होती. त्यांचे हात केवळ औषधं लिहून थांबले नाहीत, तर त्यांनी अनेकांना जगण्याची नवी उमेद दिली, विश्वासाने जगण्याचा मार्ग दाखवला.
आज त्यांचे ते आश्वासक हसणे, शांत आणि संयमी बोलणे कायमचे थांबले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक उत्तम वैद्यकीय सेवा देणारा डॉक्टर नाही, तर एक अत्यंत सुंदर आणि सहृदय माणूस हरपला आहे. त्यांच्या आठवणींचा तो आश्वासक कवडसा मात्र आमच्या मनात कायम तेवत राहील.
डॉक्टरसाहेब, तुमच्या माणुसकीच्या कार्याला आणि तुमच्या सुंदर स्वभावाला हीच खरी श्रद्धांजली. तुम्ही अनेकांच्या कुटुंबात जो विश्वास आणि प्रेम पेरलेत, ते कधीही विसरता येणार नाही.
💐 डॉ. प्रमोद कुलकर्णी यांना ‘अधोरेखित’ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली! 💐









































































