दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाचवा आणि हायहोल्टेज सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला आहे. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आणले आहे.
भारत आणि पाकिस्तानचा सामना लौकिकासारखा चांगलाच रंगला. पण भारताने या सामन्यात दमदार खेळ साकारत अखेर विजय साकारला. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण करत आहे. विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे.
भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा सलग दुसरा विजय ठरला आहे.भारताने या विजयासह दुबईतील विजयी घोडदौड कायम राखला आहे. हा दुबईतील 8 पैकी सातवा एकदिवसीय विजय ठरला आहे. तर एक मॅच टाय राहिली होती.
पाकिस्तानने दिलेल्या 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिलने जोरदार फटकेबाजी केली. खणखणीत चौकार, षटकारांची आतषबाजी सुरु असतानाच रोहित शर्मा आऊट झाला. त्यापाठोपाठ शुभमन गिलचाही त्रिफळा उडाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली, त्याला दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यरने खंबीर साथ दिली, मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो 56 वर आऊट झाला. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने शेवटपर्यंत फटकेबाजी करत जबरदस्त शतक झळकावले. तोच या सामन्याचा हिरो ठरला. विजयासाठी दोन धावांची गरज असताना कोहलीने खणखणीत चौकार ठोकत संघाचा विजय आणि त्याचे शतकही पूर्ण केले. भारताने 42.3 षटकात 244 धावा केल्या.
तत्पूर्वी, पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी महागडा ठरला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकांत केवळ 241 धावा केल्या. पाकिस्तानकडून साऊद शकीलने 76 चेंडूत 62 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. खुसदिल शाहने 38 धावा केल्या. बाबर आझमला फक्त 23 धावा करता आल्या. दुसरीकडे, टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन, हार्दिक पांड्याने दोन आणि हर्षित राणा तसेच रविंद्र जडेजाने एक बळी घेतला.
Recent Posts
बातमी शेअर करा : मनरेगा अंतर्गत भूजल पातळी वाढीसाठी ५० हजार ‘जलतारा’ निर्माण करून आदर्श मॉडेल तयार करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जलतारा प्रकल्पा... Read more