Last Updated on 28 Apr 2025 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी शाळा, नर्सरी, जूनियर केजी आणि सीनियर केजी यांची आता नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. शासनाने यासाठी ‘Pre-School Registration Portal’ सुरू केला असून, सर्व संबंधित केंद्रांनी पुढील सात दिवसांत या पोर्टलवर आपली नोंदणी करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, ५+३+३+४ या आकृतीबंधात ‘पायाभूत स्तर’ म्हणून ३ ते ८ वयोगटातील शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याने ‘State Curriculum Framework – Foundation Stage’ तयार केला आहे. त्याअंतर्गत, बालकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्याचा हेतू आहे.
राज्यातील सरकारी अंगणवाड्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्यांची नोंदणी आधीपासून आहे. मात्र, खासगी पूर्वप्राथमिक शिक्षण केंद्रांची अद्ययावत माहिती शासनाकडे नव्हती. त्यामुळे ही माहिती केंद्रीकृत स्वरूपात उपलब्ध करून घेण्यासाठी नव्या नोंदणी प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे.
नोंदणीसाठी शिक्षण केंद्रांनी विद्यार्थ्यांची संख्या, उपलब्ध भौतिक सुविधा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे. ‘education.maharashtra.gov.in‘ या संकेतस्थळावर ‘Pre-School Registration Portal (ECCE)’ टॅबमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
सर्व संबंधित खासगी शाळांनी याची तातडीने दखल घेऊन नोंदणी पूर्ण करावी, अन्यथा शिक्षण विभाग आवश्यक कारवाई करू शकतो, असा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.
स्रोत : शासन निर्णय











































































