Last Updated on 14 Dec 2025 4:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्व. जयमाला भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन; रसिक श्रोते मंत्रमुग्ध
कराड । कृष्णा परिवाराच्या आधारस्तंभ स्वर्गीय जयमाला जयवंतराव भोसले (आईसाहेब) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय संगीत सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि आईसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सौ. सुवर्णादेवी देशमुख, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सौ. रंजना मोहिते, सौ. उत्तरा भोसले, पृथ्वीराज भोसले, सौ. वसुंधरा भोसले, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, तिलोत्तमा मोहिते, सुदन मोहिते, हर्षदा मोहिते, डॉ. प्रियदर्शनी पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदाताई जाधव, सौ. रोहिणी शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांनी आईसाहेबांच्या सामाजिक, कौटुंबिक आणि संस्कारक्षम योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, आईसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत सादर करण्यात आलेल्या ‘अभंग रंग’ कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे आणि ख्यातनाम गायक महेश केंठे यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि अभंगांच्या माध्यमातून साकारलेली ही मैफल भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांनी ओतप्रोत भरलेली होती. सभागृहात उपस्थित प्रत्येक श्रोता अभंगांच्या सुरांमध्ये तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाला कृष्णा समूहातील विविध संस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































