कीर्तन या मौखिक परंपरेचा संत गाडगेबाबांनी प्रभावी वापर केला.आचार्य अत्रे यांनी ‘सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात,गाडगेबाबांना पहावे कीर्तनात’ असे म्हटले आहे.लोकांच्या विचारशक्तीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी भजनांचा आधार घेत.
‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या ओळी कीर्तनाच्या ठिकाणी सामूहिक टाळ्यांच्या गजरात वारंवार व्यक्त होत.कुठल्यातरी दुकानाच्या फळीवर गाडगेबाबांची सभा होणार असा मजकूर असे.परिसरातील लोक गाडगेबाबांच्या कीर्तनासाठी धाव घेत. सामान्य माणसासाठी त्यांनी सोपी, बाळबोध व ओघवती भाषा वापरली.समाजवादाचे व्यासपीठ म्हणून त्यांची रसाळ वाणी गर्जत राहिली.त्यांचे कीर्तन म्हणजे भावना, विनोद आणि विचार यांचे महावस्त्र असे.भुकेलेल्याला अन्न,उघड्या नागड्याला वस्त्र, बेकराला रोजगार, गरीब मुलांना शिक्षण, अंधू, पंगू, रोग्याला औषध, तहानलेल्याला पाणी, बेघराला आसरा, दुःखी माणसाला हिंमत, गरीब तरुण, तरुणींचे लग्न, मुक्या प्राण्याला अभय हीच देवपूजा, हाच रोकडा धर्म असे विचार ते मांडत. कर्ज काढून यात्रा नको, शिवाशिव पाळू नका, आई बापाची सेवा करा, अशी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना लागू होणारी आचारसंहिता हा त्यांच्या कीर्तनाचा आशय असे.
समाज प्रबोधनासाठी ते राज्यभर वार होऊन हिंडत राहिले.त्यांचे खारेपाटणाला कीर्तन सुरू असताना त्यांचा मुलगा गोविंद मरण पावल्याची तार आली.तरीही निर्विकार मुद्रेने बाबा म्हणाले, ‘ मेले ऐसे कोट्यानुकोटी, काय रडू एका साठी, बोला देवकीनंदन गोपाला’. व्यक्तिगत प्रश्नांकडे तटस्थ वृत्तीने पाहणे आणि गाडगेबाबांची प्रबळ जीवननिष्ठा या प्रसंगातून दिसते.
त्यांचे चरित्र लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर म्हणतात की,”गाडगे महाराजांनी ग्रामीण महाराष्ट्रात कीर्तन कल्लोळ उठवला.” शनिवारी, ८ नोव्हेंबर १९५६ ला वांद्रे पोलीस ठाण्यात गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन झाले. कर्मवीर भाऊराव पाटील,.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज या महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारधारेचे गाडगेबाबांनी कट्टर समर्थन केले. सॉक्रेटिसप्रमाणे श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे करीत कर्म कांडामधील निरर्थकता त्यांनी अधोरेखित केली. संत गाडगे बाबांचे कीर्तन रंगतदार वक्तृत्वाचा कलात्मक आनंद देत असे.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर