नवी दिल्ली । भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने आज रात्री 8 वाजता दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले, मात्र सिंह यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 साली पश्चिम पंजाबच्या गहमध्ये झाला. फाळणीनंतर सिंग यांचे कुटुंब भारतात आले. खुप लहान असताना सिंग यांच्या आईचे निधन झाले. सिंग यांचे पालनपोषण आजीने केले.1952 साली सिंग यांनी भारतात अर्थशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. इंडियाज एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्हनेस विषयातून त्यांनी ऑक्सफोर्डमधून पीएचडी मिळवली.1982 ते 1985 दरम्यान ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आले. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1991 ते 1996 या काळात मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचे वित्त धोरण बजावले, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला. आज परदेशी गुंतवणूक हा आजचा परावलीचा शब्द बनला आहे. त्याचे प्रणेते डॉ. मनमोहन सिंग होते. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला उद्योग आणि व्यापाराचं धोरण बदलून देशभरच्या अर्थव्यवस्थेला कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योग प्रधान किंवा सेवा प्रधान अर्थव्यवस्था बनवण्यात मनमोहन सिंहांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता. अर्थमंत्री होण्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील काम पाहिलं.
मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2009 असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवले. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते. 2004 साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर मनमोहन सिंग हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पुढे 2009 ला काँग्रेसला पुन्हा सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात मनरेगा, आधार कार्ड, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार सारखे कायदे पारित झाले. 2016 साली मोदी सरकारने नोटबंदी केली. तेव्हा नोटबंदी म्हणजे सामूहिक लूट आहे अशा शब्दांत सिंग यांनी राज्यसभेट टीका केली होती.
सिंग यांनी 1999 सा लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. सिंग हे सातत्याने राज्यसभेवर निवडून येत होते. 1998 ते 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, तेव्हा सिंग हे विरोधी पक्षनेते होते.
मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : देवेंद्र फडणवीस