Last Updated on 28 Nov 2025 7:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गावात, डोंगर-दऱ्यात किंवा शेतशिवारात अचानक बिबट्या समोर येणं ही कल्पनाही अंगावर काटा आणणारी असते. पण भीतीनं घाबरून पळून जाणं हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते. वन विभाग आणि तज्ज्ञांच्या मते, शांतता आणि जागरूकता हीच सर्वात मोठी शस्त्रं आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शेत शिवारात असणारा बिबट्याचा वावर आता लोकवस्तीपर्यंत येवून पोहोचला आहे.दबा धरून असलेल्या या बिबट्याने भीतीचे वातवरण निर्माण केले आहे.बिबट्या मानवी वस्ती किंवा शहरात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत.किंबहुना त्या वाढतच आहेत.त्यामुळेच बिबट्याची मानवी वस्तीकडील धाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनीदेखील पुरेशी सजगता दाखविण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असल्या,तरी पुरेशी दक्षता घेणेदेखील अनिवार्य बनले आहे.
काय काळजी घ्याल ?
🌑 बिबट्या ज्या परिसरात आहे,त्या परिसरात पहाटे आणि संध्याकाळी शक्यतो एकटे फिरू नका.
🌑 मोठमोठ्याने बोलत,आवाज करत जा.विजेरी वापरा.माणसाची चाहूल लागल्यावर बिबट्या शक्यतो समोर येत नाही.
🌑 बिबट्या गुरगुर आवाज करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल,मात्र तुम्ही एका जागेवर शांत आणि सावध उभे राहा.दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा.
🌑 ऊस, मका अशी पिकं अगदी घरालगत घेऊ नका.या पिकांमध्ये बिबट्याला लपून बसता येतं.ही पिकं थोडी लांब लावा.
🌑 आपला परिसर स्वच्छ ठेवा.जिथे उरलेलं अन्न आणि इतर कचरा टाकला जातो,तिथे कुत्री आणि डुकरं येतात.हे सावज टिपायला बिबट्या तिथे येऊ शकतो.
🌑 चुकून बिबट्या समोर आलाच,तर त्याच्यावर उलटून हल्ला करण्याचा किंवा त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.
🌑 त्याच्या जवळ जाऊ नका,बिबट्या स्वतःच रक्षण करण्यासाठी अटॅक करू शकतो.
🌑 जागेवर स्थिर आणि सावध असाल तर बिबट्या लगेच अटॅक करत नाही.
🌑 कुठलीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करावा,
🌑 वनविभागाच्या कारवाईदरम्यान गर्दी करून अडथळा आणू नका.
संरक्षणासाठी अशी घ्या काळजी
✪ बाहेर जाताना हातात काठी ठेवावी.काठीला घुंगरू बांधावे.जेणेकरून बिबट्या पळून जाऊ शकतो.
✪ शक्यतो मोठमोठ्याने बोला,तसेच रेडिओ अथवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावा.
✪ उन्हाळ्यात उघड्यावर अंगणात झोपू नये.उघड्यावर शौचास जाऊ नये
✪ घराला सभोवती कुंपण घाला तसेच परिसर स्वच्छ ठेवा.घराबाहेरील दिवे रात्रीच्या वेळी सुरू ठेवा.
✪ लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी.शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये.
✪ बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नका.आपल्यापेक्षा उंच असणाऱ्या प्राण्यांवर बिबट्या सहजासहजी हल्ला करीत नाही.
✪ मेंढपाळ व ऊसतोडणी कामगारांनी बिबट्यापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक
लक्षात ठेवा :
बिबट्या माणसाला शिकार म्हणून पाहत नाही. त्याच्या क्षेत्रात आपण गेलो, की तो केवळ स्वतःचं रक्षण करतो. म्हणूनच भीती नव्हे, खबरदारी घ्या!











































































