पुणे । राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देत ९६५ नवीन पदांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. यामुळे विभागातील मंजूर पदांची एकूण संख्या ३,९५२ वर पोहोचली आहे. महसूल व वन विभागाने ४ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. ही माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांनुसार करण्यात आलेल्या या मोठ्या पुनर्रचनेत, विद्यमान ३,०९४ पदांपैकी १०७ पदे रद्द करण्यात आली असून, वाढत्या कामकाजानुसार विभागाला नवीन दमदार मनुष्यबळ मिळणार आहे. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची वाढ, दस्तसंख्येत झालेली वाढ, तसेच वाढलेल्या कामकाजामुळे ही पदनिर्मिती आवश्यक होती. यासाठी अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य महसुलाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महत्त्वाचा विभाग असून, आकृतीबंधात बदल करण्याची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती. मंजूर सुधारणा अंमलात आल्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढणार, इष्टांकपूर्तीत मदत होणार आणि महसूलवाढीस चालना मिळणार, असा विश्वास नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी व्यक्त केला.
तसेच, नवीन पदबल उपलब्ध झाल्याने नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दिशेने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई । वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीस... Read more










































































