13 फेब्रुवारी : जागतिक रेडिओ दिवस
13 फेब्रुवारीलाच जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचे एक खास कारण आहे.वास्तविक, संयुक्त राष्ट्र रेडिओ 13 फेब्रुवारी 1946 रोजी सुरू झाला.संयुक्त राष्ट्र रेडिओच्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जाऊ लागला.पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे 2013 मध्ये साजरा करण्यात आला होता.
दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो. एक काळ असा होता की रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग होता. माहिती, संप्रेषण आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात असे. पण टेलिव्हिजन आणि मोबाईल यासारख्या वस्तूंच्या आगमनानंतर रेडिओ पूर्वीप्रमाणे वापरला जात नाही. परंतु, आजही रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही. जागितक रेडिओ दिनाच्या निमित्ताने त्यासंबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…
रसिक श्रोत्यांचा जिवलग मित्र ‘रेडिओ’
‘नमस्कार ! हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात…’ अशी उद्घोषणा आपल्या कानावर पडते.पूर्वीच्या काळात सकाळी-सकाळी उठल्याबरोबर ही उद्घोषणा कानी पडायची अन् आपली एकच धावपळ उडायची.कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई….उशीर झाला…अजून आवरायचं आहे,असे आवाज त्यावेळी आपल्या कानावर पडायचे.कारण त्या रेडिओ कार्यक्रमाच्या वेळेनुसार आपण आपली कामे ठरवत होतो.पण, ज्या रेडिओने आपल्याला गाण्यांचे वेड लावले, जगातील घडामोडीचे अपडेट्स दिले.
मनोरंजनाच्या साधनातील सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनीक साधन म्हणजे ‘रेडिओ’.रेडिओचा शोध 1885 साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते.मात्र भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली ‘रेडिओ क्लब’ इथे झाली. त्यावेळी घराघरात अनेक गृहिणींची सकाळ ‘मंगलप्रभात’ रेडिओ वरील गाण्यांनी व्हायची.क्रिकेट रसिक असलेले सगळेच रेडिओस्टेशन वरील कॉमेंट्रीच्या सहाय्याने सामन्यांचा आनंद घ्यायचे.ज्याच्याकडे रेडिओ असेल त्याच्याकडे सगळेजण एकत्र जमायचे आणि रेडिओवर मॅच एकायचे. सामना जसाच्यातसा समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांच्या डोळ्यासमोर उभा करण्याची किमया क्रिकेट समोलोचकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून साधली. आकाशवाणीवर क्रिकेटचा सामना ऐकण्याची मजाच काही और होती.
बातम्या
आकाशवाणी वरुन बातम्या ऐकणारा वर्ग देखील खुप मोठा होता.संध्याकाळी कामावरुन लोक घरी पोहोचले की संध्याकाळी निवेदकाच्या वृक्ष आणि एका विशिष्ट पट्टीतील बातम्या सांगण्याच्या कलेवर अनेकांनी भरुभरुन प्रेम केले. आकाशवीणीच्या दिल्ली केंद्रावरुन 1939 साली मुंबईसाठी मराठीत बातमीपत्र सुरु झाले. 5 जुन पासून दिल्लीतून प्रसारीत होणारी ही बातमीपत्रे बंद झाली आहेत.दरम्यान, आकाशवाणीने इंटरनेटच्या माध्यमातून दर तासाला ताज्या बातम्या प्रसारीत करण्यास सुरूवात केली आहे. मराठी, पंजबी, तमिळ, तेलगु, कन्नड, आसामी, उर्दु आणि गुजराती अशा वेगवेगळ्या आठ भाषांमधून या बातम्या वाचल्या जातात.
अनेक कलाकारांसाठी ठरले प्लॅटफॉर्म
आजच्या युट्यूब, टिव्ही, इंटरनेटच्या जगतात प्रसिद्धीची अनेक माध्यमे उपलब्ध असताना गदिमांचे ‘गीतरामायण’, कवी मंगेश पाडगावकरांचा ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, अरुण दातेंचे ‘शुक्रतारा’ यांसारख्या अनेक गाण्यांची, कार्यक्रमाचीं आकाशवाणी द्योतक ठरली. रात्री झोपताना जुऩ्या गाण्यांच्या कार्यक्रमांची मैफल ऐकल्या नंतरच झोपण्याची कित्येकांना सवय लागली. त्याचबरोबर जाहिरातींसाठी त्यावेळी आकाशवाणी हे सगळ्यात प्रभावी माध्यम होते.
एफएम चा शोध
सन 1977 ला एफएम आले आणी आकाशवाणीच्या तंत्रज्ञानात आणखीनच भर पडली. अनेक खाजगी कंपन्यांद्वारे एफएम चॅनल्स चालवले जातात. एकट्या मुंबईत एकूण 16 एफएम वाहिन्या चालवल्या जातात. कित्येक घरांमधील गृहिणी आजही आकशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील कार्यक्रम ऐकतात. अनेक ट्रक, टॅक्सी ड्रायवर आजही रेडिओ ऐकतात.
टिव्हीचे आगमन
स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने, चोरून पत्रके छापणे आणि वाटणे याच्यासोबत चोरटे रेडिओ केंद्र चालविणे हाही एक महत्त्वाचा भाग होता. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. 1982 साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला.
रेडिओचा शोध
रेडिओचा इतिहास रोमांचक असला तरी रेडिओचा शोध कोणी लावला याबाबत वाद आहे.प्रथम रेडिओ उपकरण कोणी तयार केले हे आपल्याला ठाऊक नसले तरी 1893 मध्ये संशोधक निकोलाई टेस्ला यांनी सेंट लुईस येथे वायरलेस रेडिओचा शोध लावला याबाबत आपल्याला माहिती आहे. हे खरे असेल तरी गुग्लिल्मो मार्कोनी हे रेडिओचे जनक म्हणून ओळखले जातात. हे तेच मार्कोनी आहेत ज्यांनी १८९६ ला इंग्लंडमध्ये रेडिओच्या इतिहासामध्ये आपले स्थान मिळविणाऱ्या पहिल्या वायरलेस टेलिग्राफी पेटंटचा पुरस्कार पटकाविला होता. त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर टेस्लाने त्याच्या मूलभूत रेडिओ पेटंटसाठी अमेरिकेत अर्ज दाखल केला. मार्कोनीला पेटंट मिळाल्यानंतर जवळपास चार वर्षांनी टेस्लाचा पेटंट अर्ज मंजूर करण्यात आला. अगदी पहिला रेडिओ कोणी तयार केला, याची पर्वा न करता, 12 डिसेंबर 1901 रोजी, अटलांटिक सागर ओलांडून सिनल प्रसारित करणारा मार्कोनी पहिला व्यक्ती ठरला. त्यावेळी इतिहासामध्ये रेडिओचा जनक म्हणून मार्कोनीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
भारतात कधी आला रेडिओ
जून १९२३ मध्ये ब्रिटीश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि अन्य रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांनी रेडिओ प्रसारणास प्रारंभ झाला. त्यानंतर २३ जुलै १९२७ च्या करारानुसार ब्रिटीश ब्रॉडकॉस्ट कंपनीला मुंबई आणि कोलकाता हे दोन्ही रेडिओचे केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आली. १ मार्च १९३० ला ही कंपनी दिवाळखोरीमध्ये गेली. त्यानंतर सरकराने रेडिओचे प्रसारण ताब्यात घेतले. १ एप्रिल १९३० दोन वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर भारतीय राज्य प्रसारण सेवा (iSBS)ची सुरुवात झाली. त्यानंतर ८ जून १९३६ ला ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) मध्ये रुपांतर करण्यात आले. हेनाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले,तेव्हा दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, तिरुचिरापल्ली आणि लखनौ येथे भारतीय हद्दीतील सहा रेडिओ केंद्र होते. त्यानंतर पहिले एफ. एम ब्रॉडकॉस्टींग २३ जुलै १९७७ ला मद्रास येथे सुरू झाले.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे