मुंबई । विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची एक बैठक पार पडणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही बैठक ही मंत्रालयात होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे सांगण्यात येते.
राज्याची विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्यााची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जात आहे. तर, दुसरीकडे मंत्रालयात प्रशासकीय पातळीवरही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठीच्या कार्यवाहीसाठी लगबग सुरू आहे. आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.गेल्या १५ दिवसांत ही चौथी बैठक होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक १० ऑक्टोबरला झाली होती. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे म्हटले जात होते. मात्र सोमवारी सकाळी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. आता आजची मंत्रिमंडळ बैठक ही शेवटची असेल असे म्हटले जात आहे. महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आणि शासन निर्णयांद्वारे निर्णयांचा सपाटा लावला आहे, त्यात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीची भर पडणार आहे.
हे वाचलंत का? – खुपऱ्याविरोधातील लढाईत भारताचा विजय, ट्रॅकोमा (खुपऱ्या) मुक्त भारत
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुका जाहीर करू शकतो. दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह २६ नोव्हेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे. आचारसंहितेचा कालावधी 30 दिवसांचा असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे.
महिन्याभरात मंत्रिमंडळ बैठका
२३ सप्टेंबर : २४ निर्णय
३० सप्टेंबर : ३८ निर्णय
४ ऑक्टोबर : ३२ निर्णय
१० ऑक्टोबर : ३८ निर्णय