प्रश्न – मी सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहिले तर,या वर्षी गणेश चतुर्थी दि. 18 सप्टेंबर तर,काहीजण दि. 19 सप्टेंबर सांगतात. तर आम्ही कधी करावी ?
उत्तर – आपण 19 सप्टेंबर 2023 ला करावी.
कारण,काही पंचांगाच्या गणित पद्धती मध्ये फरक असल्यामुळे असे असावे.पण हा सर्व विषय त्या क्षेत्रातील तज्ञांचा आहे.आपण त्या फंदात न पडता आपण नेहमी जे पंचांग वापरतो ते प्रमाण मानावे.
उदा. दाते पंचांग,रुईकर,कालनिर्णय,राजंदेकर,स्वामी समर्थ आणि भारत सरकारचे राष्ट्रीय पंचांग तसेच महालक्ष्मी कॅलेंडर यामध्ये 19 तारीख दिलेली असल्यामुळे आपण 19 तारखेला गणेश चतुर्थी करावी .
प्रश्न क्र .1 : या वर्षी गणेश पूजन कधी व कोणत्या वेळी करावे.पूजनाचा मुहूर्त वगैरे असतो काय?
उतर – पार्थिव गणेश पुजन
दिनांक 19 सप्टेंबर 2023
मंगळवारी प्रातःकालापासून मध्यांह्नापर्यंत म्हणजे दु .1.30 पर्यंत कोणत्या वेळी गणेश पूजन करावे.
यासाठी विशिष्ट नक्षत्र,योग विष्टी करण’ इ. काहीही पाहण्याची आवश्यकता नसते .
बऱ्याच वेळा सोशल मीडियावर तर मुहूर्ताचा ऊत आल्याचाही दिसतो.तसेच शिवालिखित कोष्टकानुसार लाभ अमृत अशा कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते .
( पंचांगाधार: दाते पंचांग)
प्रश्न 2 : गणेश मुर्ती कोणत्या सोंडेची असावी ?
उत्तर – उजव्या सोंडेचा गणपती चांगला,डाव्या सोंडेचा गणपती वाईट असा समज करून घेणे पूर्ण चुकीचे आहे.कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात,सरळ सोंड वक्रण्तुड त्रिनयना.
त्याच बरोबर सोंड कुणीकडे करायची ते मूर्ती काराच्या कलात्मकतेचा भाग आहे.त्यामुळे सोंडेला अजिबात महत्त्व नाही.
प्रश्न 3 : गणेश मूर्तीची उंची अंदाजे किती असावी?
उत्तर – शास्त्रानुसार स्थापनेसाठी वीतभर उंचीची आसनस्थ शाडू किवा मातीची मूर्ती असावी.
प्रश्न 4 : भाद्रपद चतुर्थीला गणपती बसवता नाही आला तर पुढे बसवता येईल का?
उत्तर – नाही,भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी आपल्या काही अडचणीमुळे गणेश स्थापना करता आली नाही तर इतर कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही.मग एखादे वर्षे लोप झाले तरी चालेल.
प्रश्न 5 : गणेश मूर्ती त्याच दिवशी आणली पाहिजे असे शास्त्र आहे का?
उत्तर – नाही,गणेश मूर्ती त्याच दिवशी आणली पाहिजे असे नाही तर दहा-पंधरा दिवस अगोदरही आणून ठेवली तरीही चालते .
प्रश्न 6 : काही वेळा हरतालिका आणि गणपती एकाच दिवशी येतात अशावेळी कोणती पूजा अगोदर आणि कोणती पूजा नंतर करावी?
उत्तर – तर कोणतीही पूजा अगोदर आणि कोणतीही नंतर करू शकता.
प्रश्न 7 : गणपती विसर्जन किती दिवसांनी करावे?
उत्तर – आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार दिड दिवस ,पाच दिवस ,सात दिवस, दहा दिवस ही पूजन करता येईल.
प्रश्न 8 : आमच्या घरामध्ये गर्भवती स्त्री आहे आम्ही गणपती विसर्जन करू शकतो का?
उत्तर -हो,करावे.घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेशमूर्ती विसर्जित केली जात नाही तर ही प्रथा अज्ञानमूलक आणि चुकीची आहे.गणेश मूर्ती विसर्जित करावी असे शास्त्र आहे
प्रश्न 9 : मूर्तीचे विसर्जन कसे करावे?
उत्तर – मूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे असे असल्यामुळे बादलीत, हौदात, जलाशयात करावे अर्थात विरघळणे आवश्यक असल्यामूळे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एक वीत उंचीची, विरघळणाऱ्या मूर्तीचीच निवड करावी.तसेच मोठी मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस,धातूची इ. उत्सव मूर्ती म्हणून ठेवण्यास काहीच हरकत नाही.मात्र ती उत्सव मूर्ती विसर्जित न करता शोकेसमध्ये ठेवायला काहीच हरकत नाही .
प्रश्न 10 : सोयर/सुतक मासिक धर्म असताना गणपती बसवावा का?
उत्तर – गौरी गणपती उत्सव वर्षातून एकदाच येत असतात .आणि या उत्सवाची अनेकाना हौस असते. आणि त्या वेळेला नेमके सोयर/सुतक तसेच घरी मासिक धर्माची अडचण होते.खरतर जन्म ही घटना आनंददाई असल्यामुळे माता पित्याला फक्त दहा दिवस सोयर घरातील इतर कुणालाही नाही.
त्याचबरोबर अशावेळी मासिक धर्म लांबवण्यासाठी काही औषधे गोळ्या घेतल्या जातात आणि पुढील काळात त्याचे दुष्परिणाम व त्रास भोगावे लागतात. हे टाळण्यासाठी पंचांग कर्ते,अनंत दाते यांनी प्रकाशित केलेल्या 21 व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म या ग्रंथात अभ्यास पूर्ण विचार मांडले आहेत.अगदी सविस्तर या इथे मांडता येणार नाहीत पण थोडक्यात,गोमूत्र प्राशन आणि गोमूत्र व तुळशीचे पान पाण्यात टाकून स्नान करावे.तुळशीचे पान खावे.त्याच बरोबर प्रत्येकाच्या घरात सोने असते ते पेलाभर पाण्यात टाकून पाणी पाच मिनिटे उकळावे आणि ते सुवर्ण जलसिद्ध जल ,एक चमचाभर प्राशन करून अशा कार्यासाठी पवित्र होता येते.
हेही वाचा – गौरी पूजन : समज,गैरसमज; जाणून घ्या
वरील ग्रंथानुसार भावकीतल्या सुतकाचा विचार इथे सविस्तर मांडता येणार नाही मात्र अगदी आपल्या घरी राहणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले तर मात्र दहा दिवसापर्यंत गणपती बसवू नये.
गणपती बसवल्यानंतर सुतक आले तर पूजन दुसऱ्याकडून करून घेऊन लगेचच मूर्ती विसर्जित करावी. इतरांनी शुद्धीसाठी वरील गोष्टीचा विचार करावा.
प्रश्न 11 : स्थापना केल्यानंतर गणपतीची मूर्ती दुखावली तर काय करावे?
उतर – स्थापना केलेली मूर्ती उत्सवाच्या दिवसात काही कारणामुळे दुखावली,भंगली असेल तर लगेचच विसर्जित करावी.त्यानंतर पुन्हा गणेश मूर्ती मात्र आणून बसवू नये.
प्रश्न 12 : या वर्षात आमच्या घरातील व्यक्तीचे निधन झालेला आहे .त्यामुळे आम्ही गणपती बसवू शकतो का?
उत्तर – हो,या वर्षात घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले म्हणून काही लोक गणपती बसवत नाहीत तर ही प्रथा अज्ञानमूलक आहे.फारशी आरास न करता साध्या पद्धतीने मूर्ती बसवायला काहीचं हरकत नाही.
प्रश्न 13 : गणेश विसर्जन मंगळवारी करू नये असे म्हटले जाते हे योग्य आहे का?
गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवार अथवा कोणत्याही वारी तसेच कोणतेही नक्षत्र असताना केले तरी चालते.
प्रश्न 14 : मी पार्थिव गणेश मूर्ती नवीन न आणता दरवर्षी त्याच मूर्तीची पूजा करतो हे कितपत योग्य आहे?
उत्तर – पार्थिव मूर्तीचे जलाशयात विसर्जन होणे आवश्यक आहे .
प्रश्न 15 : काही मंडळी गणपती विसर्जनाच्या वेळी जलाशयाच्या ठिकाणी आरती करताना दिसतात.
उत्तर – एकदा घरी आरती केल्यानंतर परत जलाशयाच्या ठिकाणी आरतीची आवश्यकता नसते .कारण घरी अक्षता वाहून ती मूर्ती विसर्जित करूनच बरोबर घेतलेली असते.
अध्यात्म शास्त्रात गणपतीलाच ओंकार म्हंटलेलं आहे.पातंजल योग दर्शनात पतंजली मुनी म्हणतात,
तस्य वाचक:प्रणव: ||तज्जपस्तदर्थ भावनम्||
माझ्या मते खरंतर पूजा ही देवासाठी नसून आपल्यासाठी असते.आणि ईश्वर आपल्या अंतरात्म्यात असल्यामुळे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, मूर्तीच्या समोर बसून ओंकार जपाने,आपल्या अंतर्मनातील षडरुपी काजळी काढून टाकने आणि मूर्ती विसर्जनानंतर ही ईश्वरी आत्मज्योतीच्या प्रकाशाची अनुभूती घेत राहणे म्हणजे खरी गणेश पूजा होय.
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.