मुंबई । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले, ते 86 वर्षाचे होते.गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला.मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते.शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते.
मनोहर जोशी यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक पदांवर काम केले होते. ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते विधानसभेचे आमदार राहिले, विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना संसदेत पाठवले. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून काम केले. तसेच ते लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत.