सांगली । शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मिक निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.
न्यूमोनिया झाल्याने रविवारी (30 जानेवारी) दुपारी त्यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती.त्यांच्या जाण्याने खानापुर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.
खानापूर तालुक्यातील गार्डी गावचे सरपंच ते चार वेळा आमदार असा त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास होता.रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे.
सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला.त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या.जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे.खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून ते निवडून आले.पुढे १९७९ मध्ये सांगली जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस पक्षातर्फे ते निवडून येऊन बांधकाम समिती सभापतिपदी त्यांची निवड झाली. 1982 ते 1990 अखेर त्यांनी खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले.
खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे.बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन,कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो,अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून 1972 मध्ये काम केले.गार्डी गावचे सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. दरम्यानच्या काळात त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले.1990 मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले.यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती.सर्व पक्षाच्या नेत्यांमध्ये अनिल बाबर यांचे चांगले संबंध होते. 1990 ला ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले.त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2014 तसेच 2019 मध्ये अनिल बाबर हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. 4 वेळा त्यांनी आमदारकी भूषवली आणि मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली.
समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला : एकनाथ शिंदे
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे,अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आ. बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी, सिंचनासाठी अथक प्रयत्न केले.कृष्णा खोऱ्यातील पाणी तसेच टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले.
खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.