सांगली । बहे (ता.वाळवा) येथील प्रसिद्ध कवी सुरेश मोहिते यांची भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि साहित्य अकादमी या राष्ट्रीय पातळीवरच्या वाङ्मयीन संस्थेच्यावतीने आयोजित सात दिवसीय बहुभाषिक साहित्योत्सवासाठी निवड झाली आहे.राष्ट्रीय पातळीवरच्या साहित्य महोत्सवासाठी निवड झालेले वाळवा तालुक्यातील ते पहिले कवी आहेत.११ ते १६ मार्च २०२४ या कालावधीत राजधानी दिल्ली येथे हा साहित्य महोत्सव संपन्न होणार आहे.
वृत्तीने शेतकरी असलेले आणि लोकपरंपरा,लोकसंस्कृती आणि लोकलयींचे अस्सल भान असलेले श्री.सुरेश मोहिते हे गेय परंपरेतले महाराष्ट्रातले महत्त्वाचे कवी आहेत.’कृष्णाकाठच्या कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे.महाराष्ट्रभर त्यांच्या कवितांचे कार्यक्रम होतात.लोकपरंपरेतील प्रतिमा आणि प्रतीकं हे त्यांच्या कविताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.कवी सुरेश मोहिते हे ग्रामीण कविताकार व ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे कवी आहेत.पर्यावरण शेती साहित्य ग्रामीण भाषा शैली यावर त्यांच्या कविता विशेष गाजलेल्या आहेत.
राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या या वर्षीच्या महोत्सवामध्ये दीडशेच्यावर साहित्यिक विविध साहित्यिक उपक्रम सादर करणार आहेत.यावेळी १०० भारतीय भाषांमधील ७०० पेक्षा जास्त लेखक, कवी व विद्वान यांचा सन्मान व त्यांचे साहित्य विचार सादरीकरणासह सहभाग होणार आहे. त्यांच्या विविध विचार, कला, काव्य, कथा, गायण व कविता सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.
आपला भारत हा नेहमीच कवितेचा व काव्यासाठी प्रसिद्ध देश राहिला आहे. वेद काळापासून आज पर्यंत काव्याने भारतीय उपखंड भरलेला आहे. अनादी काळापासून रचलेल्या कवितांची व्याप्ती व त्यामधील कवींचा उद्देश यासह भारताला कवींनी काव्यमय केलेले आहे.या महोत्सवा दरम्यान २१ व्या शतकातील भारतीय कविता हे बहुभाषिक कवितेच्या सादरीकरणाचे हे सत्र होणार आहे. यामध्ये शुक्रवारी १५ मार्चला सकाळी मराठी भाषिक कवी म्हणून महाराष्ट्रातील व ग्रामीण कविताकार म्हणून सुरेश मोहिते यांच्या कविता सादर होणार आहेत.यामध्ये मराठी रानकवी म्हणून त्यांचा सहभाग विशेष राहणार आहे.साहित्य अकादमी कडून या महोत्सवामध्ये कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.