Last Updated on 26 Jul 2024 6:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची घोषणा
सांगली । राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने सन २०१४-१५ साली घेतलेल्या प्रतिटन रुपये १४७ या ऐच्छिक ठेवीतील प्रतिटन रुपये ७५ रुपये गेल्या नोव्हेंबर महिन्यात परत दिले आहेत. उर्वरित प्रतिटन रुपये ७२ प्रमाणे एकूण रक्कम रुपये ११ कोटी ८४ लाख येत्या १ ऑगस्ट २४ रोजी लोकेनते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीदिनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केली.साखराळे युनिटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
साखराळे येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२४-२५ चा रोलर पूजन प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,जेष्ठ संचालक बाळासाहेब पवार,बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतीक पाटील पुढे म्हणाले,आपण सन २०१४-१५ साली ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्याकडून प्रति टन रुपये १४७ ची ऐच्छिक ठेव घेतली होती. त्यातील प्रति टन रुपये ७५ प्रमाणे एकूण रुपये १२ कोटी ३५ लाख ४ हजार दि.३ नोव्हेंबर २०२३ रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. त्यातील उर्वरित प्रतिटन रुपये ७२ प्रमाणे दि.१ ऑगस्टला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत आहे. ही एकूण रक्कम ११ कोटी ८४ लाख २ हजार इतकी होते. आपल्या साखराळे युनिटमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात होते. हा प्रकल्प गळीत हंगाम सुरू होताना कार्यान्वित होणार आहे. ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत.
याप्रसंगी संचालक सर्वश्री रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,दादासाहेब मोरे,प्रतापराव पाटील,सौ.मेघा पाटील,शैलेश पाटील,प्रा.डॉ. योजना शिंदे-पाटील,दिलीपराव देसाई,हणमंत माळी,राजकुमार कांबळे,रमेश हाके,वैभव वसंतराव रकटे,मनोहर सन्मुख,कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,सचिव डी.एम.पाटील,चीफ इंजिनिअर विजय मोरे,चीफ केमिस्ट सुनिल सावंत,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












































































