धोनीनंतर रोहितने रचला इतिहास, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
भारताने तब्बल 13 वर्षांनंतर जिंकला T20 विश्वचषक
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला
बार्बाडोस । भारताने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध थरारक झालेल्या सामन्यात विजय मिळवून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने एका क्षणाला सामना गमावला असे वाटत होते. मात्र हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं.त्यानंतर सूर्यकुमार यादव याने गेमचेंजिंग कॅच घेतला.त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी शानदार विजय मिळवला.भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे.
भारताच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या हे तिघे भावूक झाले.तिघांना अश्रू अनावर झाले.विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकमेकांना घट्ट मीठी मारत एकमेकांचे अभिनंदन केले.
भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे.बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या.प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या या विजयासह भारताचा 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला.भारताने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.त्याचबरोबर भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 2011 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
भारताने 17व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले.16 षटकांत दक्षिण आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या होत्या. त्यानंतर मिलर आणि क्लासेन क्रीजवर होते. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 24 चेंडूत 26 धावांची गरज होती. यानंतर 17व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ चार धावा दिल्या. 18व्या षटकात बुमराहने यान्सेनला बाद करत दोन धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात चार धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. रबाडाने दुसऱ्या चेंडूवर चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले.शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.
तत्पूर्वी भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामध्ये सलामीला आलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा भारताला चांगली सुरुवात करुन देऊ शकले नाहीत.रोहित शर्मा केशव महाराजच्या चेंडूवर क्लासेनच्या हातात झेलबाद झाला.रोहितनंतर रिषभ पंतला देखील महाराजने त्याच ओव्हरमध्ये शून्यावर तंबूत पाठवलं होतं.
भारताकडून सलामीवीर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चांगली भागीदारी रचली. कोहलीने भारतासाठी 59 चेंडूत सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकले. तर अक्षरने 31 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी खेळली.त्यामध्ये त्यानं खणखणीत 4 षटकार ठोकले. शिवम दुबेनं 27 धावांची खेळी खेळली आणि भारतानं 7 गडी गमावून 176 धावा ठोकल्या.दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिले.
दक्षिण आफ्रिकेसाठी फिरकीपटू केशव महाराज आणि वेगवान गोलंदाज एनरिक नाॅर्टजे यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, मार्को जेन्सन यांनी 1-1 विकेट घेतली.
विराट कोहली सामनावीर
विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विराटने अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने 59 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या.
पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ संदेश जारी करून केले टीम इंडियाचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ संदेश जारी करून टीम इंडियाचे अभिनंदन केले.ते म्हणाले, या शानदार विजयाबद्दल संपूर्ण देशाच्या वतीने भारतीय संघाचे अभिनंदन. तुमच्या चमकदार कामगिरीचा देशवासीयांना अभिमान वाटत आहे.तुम्ही विश्वचषक जिंकलात,पण भारतातील प्रत्येक गावात आणि गल्लीबोळात तुम्ही देशवासीयांची मने जिंकलीत.ही स्पर्धा कायम स्मरणात राहील. इतके देश, इतके संघ आणि एकही सामना न गमावणे ही काही छोटी उपलब्धी नाही. तुम्ही मोठा विजय नोंदवला.
Photo Source : Indian Cricket Team