डाॅ.अरुणा ढेरे,डाॅ.दिलीप धोंडगे,डाॅ.सचिन केतकर,अतुल पेठे,डाॅ.देविदास वायदंडे यांचा समावेश
सांगली । राज्याचे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारे ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ अकादमीचे निमंत्रक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे घोषित केले.
साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता प्रसिद्ध कवयित्री व साहित्याच्या अभ्यासक डॉ.अरुणा ढेरे (पुणे) यांना ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान’ देण्यात येणार आहे.५० हजार रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप आहे.
‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्माना’साठी शैली शास्त्रीय समीक्षेतील गुणवत्तापूर्ण योगदाना करिता प्रसिध्द समीक्षक डाॅ.दिलीप धोंडगे (सटाणा),साहित्यातील गुणवत्तापूर्ण अनुवादा करिता प्रसिध्द अनुवादक व कवी डाॅ.सचिन केतकर (बडोदा) आणि प्रायोगिक रंगभूमी वरील योगदानाकरिता प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या सन्मानांचे स्वरुप आहे.
या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील ललित कला विशेष सन्माना’करिता संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील ग्रंथांचे लेखक प्राचार्य डाॅ.देवीदास वायदंडे (सोमेश्वरनगर) यांची निवड केली आहे.१० हजार रुपये सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे.अकादमीचे सदस्य डाॅ.संजय करंदीकर (बडोदा) यांचाही समीक्षा व संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवपर सत्कार करण्यात येणार आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे महा विद्यालयीन शिक्षण बडोदा येथे झाले. या काळात सयाजीराव महाराजांच्या समाजहित कारक कृतिशील विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले.पदवी शिक्षणाच्या तीन वर्षांच्या काळात बापूंचे वास्तव्य बडोदा शहरात होते,म्हणून सन्मान वितरण समारंभाचे आयोजन बडोदा येथे केले आहे. राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि मराठी वाड्.मय परिषद बडोदे(गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने बडोदा येथे ३० जून रोजी सन्मान वितरण समारंभ आयोजित केला आहे. प्रमुख अतिथी श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड (बडोदे संस्थान) यांच्या शुभ हस्ते व राज्याचे माजी मंत्री,आ.जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षते खाली सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अकादमीच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डाॅ.सदानंद मोरे आणि राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांची समारंभास विशेष उपस्थिती आहे. सन्मान पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे.
आपल्या रचनात्मक कार्याने शिक्षण, सहकार,कृषी,उद्योग अशा विविध क्षेत्रांचा विकास करून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिलेल्या स्व.बापूंच्या विचारांची जोपासना व प्रसार राष्ट्रीय पातळी वर करण्याची भूमिका राजारामबापू पाटील ललित कला अकादमीची आहे.स्व. बापूंच्या ध्यासपूर्ण जीवनातून प्रतिभावंतांच्या निर्मिती ला प्रेरणा मिळावी,या उदात्त हेतूने अकादमीने ललित कलांमधील व लोककलेतील प्रतिभा वंतांचे योगदान विचारात घेऊन प्रतिवर्षी सन्मान पुरस्कार देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कासेगांव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी.सावंत,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील,स्वीय सहाय्यक मोहन चव्हाण,डाॅ.हेमंत अय्या(गोवा),डाॅ.नम्रता बागडे (हैदराबाद),मोहन रेडगावकर(इंदूर),उद्योजक सतीश पाटील,सुनिल चव्हाण, विश्वनाथ पाटसुते,प्रा.मिलींद जोशी, सुनिताराजे पवार,शिरीष चिटणीस,विनोद कुलकर्णी,डाॅ.दत्ता बारबोले,डाॅ.संदीप सांगळे आदी महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांचा अकादमीमध्ये समावेश आहे.मराठी वाड्.मय परिषदेचे पदाधिकारी डाॅ.मिलींद बोडस,संजय बच्छाव,चेतन पावसकर,शशांक केमकर यांच्यासह अकादमीचे वसंत पाटील,डाॅ.अनिल मडके, दिनेश औटी,अंजली कुलकर्णी,मनीषा पाटील,डाॅ.राजेंद्र माने,रघुराज मेटकरी,सुभाष कवडे,सुरेश आडके,दीपक पवार आदी साहित्यिक सदस्य समारंभाच्या संयोजन समितीमध्ये कार्यरत आहेत.