मुंबई । शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे.त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे.निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आले आहे.
गेल्या सहा महिन्यांत पार झालेल्या 10 हून अधिक सुनावणींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केले आहे.अगदी शिवसेना पक्षात फूट पडून अभूतपूर्व परिस्थितीनंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण बहाल केला होता.त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह सोपवल्याने निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
शरद पवार गटाला 3 पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी 7 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंत वेळ देण्यात आली आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे.
बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आले होते. महाराष्ट्रातले 41 आमदार आणि नागालँडमधील 7 आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे.तसेच लोकसभेतील 2 खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेलं आहे.दुसरीकडे महाराष्ट्रातील 5 आमदारांनी दोन्ही गटाकडून शपथपत्रे दिलेली आहेत.हेच सारं लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे अडीच वर्षांचं सरकार पडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आले.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह गेले.निवडणूक आयोगात याप्रकरणी सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला होता.त्यानंतर वर्षभरात म्हणजे गेल्या वर्षी 2 जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडून आला होता.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारले.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगात याचिका देखील दाखल केली होती त्यांच्या पाठोपाठ शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात धाव घेतली होती.निवडणूक आयोगात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता.लाखो प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूने निवडणूक आयोगात जमा करण्यात आले होते.अखेर या प्रकरणी मोठा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.