चाफकटर, सेंद्रीय शेती साहित्य, ड्रोन प्रशिक्षण व खरेदीसाठी अनुदान उपलब्ध
जिल्हा परिषद कृषि विभाग स्वीय निधी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली । जिल्हा परिषद सांगली कडील कृषि विभागाच्या स्वीय निधी योजनेतून चाफकटर, पाईपसंच, सेंद्रीय शेती विकास प्रकल्प आवश्यक निविष्ठा व यंत्रसामग्री पुरविणे, शेतीसाठी ड्रोन प्रशिक्षण व ड्रोन खरेदीसाठी अनुदान देणे व कृषि क्षेत्रात AI (कृत्रिम बुध्दिमत्ता) वापर प्रोत्साहनासाठी योजना सुरु झाली आहे. अर्जाचा नमुना ग्रामपंचायत कार्यालयात तसेच पंचायत समितीत उपलब्ध असून जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
जिल्हा परिषद स्वीय निधी सन २०२५-२६ मधून शेतकऱ्यांसाठी डीबीटीव्दारे २ HP चाफकटर (कडबाकुट्टी मशीन) साठी 10 हजार रूपये किंवा किंमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते, पाईप संच या घटकासाठी प्रती मिटर ३५ रु. किंवा 10 हजार रूपये किंवा किमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते, सेंद्रीय शेती विकास प्रकल्प आवश्यक निविष्ठा व यंत्रसामुग्री पुरविणे आणि सेंद्रीय शेती प्रमाणिकरण करुन घेणे रक्कम 10 हजार रूपये किंवा किंमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते, शेतीसाठी ड्रोनचा वापर प्रशिक्षण व अनुदानावर ड्रोन पुरवठा करणे रक्कम 10 हजार रूपये प्रती शेतकरी प्रशिक्षणाकरीता आणि रक्कम 1 लाख रूपये ड्रोन खरेदी करीता, कृषि क्षेत्रात AI (कृत्रिम बुध्दिमत्ता) वापर प्रोत्साहन योजना रक्कम 10 हजार रूपये किंवा किंमतीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते प्रति शेतकरी अनुदान देय राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी नजीकच्या पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज ७/१२ उतारा, खातेउतारा, आधार कार्ड, अवजाराचे कोटेशन, अर्जाप्रमाणे इतर कागदपत्रे जोडून अर्ज दि. २७ जून २०२५ पर्यंत पंचायत समितीत सादर करावा, असे आवाहनही प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
स्रोत : जिमाका, सांगली