Last Updated on 17 Apr 2025 4:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जिल्ह्यातील फार्णेवाडी गावच्या सुपुत्राने शिल्पकलेच्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. आदर्श फार्णे याची दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा या पाच राज्यांतील निवडक शिल्पकारांमधून राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रवींद्र भवन, साखळी (गोवा) येथे 27 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात देशभरातील दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव होणार आहे.
आदर्श याचा जन्म फार्णेवाडी येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील सुनील फार्णे आणि चुलते संदीप फार्णे यांना आदर्शमध्ये लहानपणापासूनच कलाक्षेत्राची झलक दिसली होती. सन 2019 मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर, आदर्शच्या पाठीशी उभे राहिले ते त्याचे चुलते संदीप फार्णे. शिक्षणासाठी त्यांनी पूर्ण आर्थिक पाठबळ दिले आणि वडिलांच्या जागेची उणीव भरून काढली.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेत शिल्पकलेचे शिक्षण घेत असलेल्या आदर्शने विविध महापुरुषांची आणि नेत्यांची अप्रतिम शिल्पचित्रे साकारली आहेत. 2023 मध्ये त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते.
2024-25 या वर्षी ‘बेस्ट आर्टवर्क’ सन्मान या वर्षी सर जे.जे. स्कूलच्या वार्षिक प्रदर्शनात ‘शिल्पकला आणि मॉडेलिंग’ विभागाकडून ‘बेस्ट आर्टवर्क’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हे यश साध्य करताना त्याने जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीशी केलेली झुंज यामुळेच यशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे स्पष्ट होते.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्राकडून कौतुक संदीप फार्णे हे रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा सरचिटणीस आहेत. पुतण्याच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी हा गौरवाचा क्षण ठरला आहे. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातूनही आदर्शचे भरभरून कौतुक होत आहे.











































































