Last Updated on 26 Mar 2025 8:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
‘ग्रामपंचायत निधीचा डिजिटल हिशोब : पारदर्शकतेचा आदर्श!’
सांगली । वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठी वसलेले जुनेखेड हे गाव सध्या पारदर्शक ग्रामपंचायत कारभाराचा आदर्श उभा करत आहे. सत्तेचा उपयोग व्यक्तिगत लाभासाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी कसा करावा याचा आदर्श इथल्या तरुणांनी उभा केला आहे.
ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रियांका पाटील आणि त्यांचे पती अभियंता राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक आणि विधायक कारभाराच्या नव्या वाटा शोधल्या जात आहेत. विशेष म्हणजे, गावाच्या विकासासाठी वापरलेला प्रत्येक रुपया ग्रामस्थांसमोर डिजिटल स्वरूपात सादर केला जातो.ग्रामपंचायत निधीचा एकही पैसा कुठे कसा खर्च झाला, याचा हिशोब डिजिटल स्वरूपात थेट ग्रामस्थांसमोर मांडला जातो.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रवास खर्च घेतले नाहीत. निधीतील कामे बाहेरच्या ठेकेदारांकडे न देता, ती ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण केली जात आहेत. काटकसर करत केवळ सहा लाखांत रस्ता बांधला गेला, जो इतर ठिकाणी कित्येक पट जास्त खर्च करून केला जातो.
ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकणं किंवा हारणं यापेक्षा व्यवस्था सुधारण्यावर गावातील तरुण भर देत आहेत. “Good Governance is New Nationalism” हे सूत्र स्वीकारत, सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
गावातील महिला सन्मान कार्यक्रमासाठी उद्योजक संभाजीराव पाटील यांनी निधी दिला. सरकारी पैशांवर अवलंबून न राहता, चांगल्या कामांसाठी समाजाचाही हातभार लावला जाऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.
“सत्ता की ना आयु बडी,
सेवा की ध्वज सदा खडी!”
संत तुकडोजी महाराजांच्या या उक्तीला अनुसरून, जुनेखेडची तरुण पिढी निस्वार्थ लोकसेवेचा ध्वज हाती घेत आहे. शिक्षण, प्रशासन आणि पारदर्शक कारभाराची नवी दिशा ठरवत आहे.

जुनेखेड पॅटर्न – इतर गावांनी घ्यावा आदर्श!
जुनेखेड ग्रामपंचायतीने घालून दिलेला पारदर्शक कारभाराचा नवा पॅटर्न हा इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. ग्रामपंचायतीने निधीचा योग्य विनियोग करत प्रत्येक हिशोब जनतेसमोर डिजिटल स्वरूपात ठेवला आहे. कोणतेही काम ठेकेदारांना न देता थेट ग्रामस्थांच्या सहभागातून पूर्ण करण्यात आले, ही या प्रयोगाची सर्वात मोठी ताकद आहे.
गावच्या विकासासाठी निधी मिळतो, पण तो पारदर्शक पद्धतीने आणि काटकसरीने वापरणे, हे अनेक गावांना जमत नाही. मात्र जुने खेडने काटकसर आणि लोकसहभागाच्या जोरावर कमी खर्चात दर्जेदार विकासकामे पूर्ण करून दाखवली. एवढेच नाही, तर ग्रामपंचायत सदस्यांनी प्रवास भत्ता आणि मानधन घेण्यास नकार देत खऱ्या अर्थाने सेवाभावी दृष्टिकोन ठेवला.
आज अनेक गावांमध्ये राजकीय गटतट, अपव्यय आणि बोगस खर्चाचे प्रकार सर्रास दिसतात. जुनेखेडने मात्र एक वेगळी वाट धरत गावविकासात पारदर्शकता आणि सुशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही हा पॅटर्न आत्मसात करून निधीचा सुयोग्य वापर, लोकसहभाग आणि जबाबदारीने कार्य करण्यावर भर द्यायला हवा.












































































