जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांची माहिती
सांगली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील एकण 538 लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, सध्या ही योजना राबवण्यात जिल्हा देशात द्वितीय स्थानी व राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षासाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे लागू केली आहे. या योजनेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार वाढविणे, नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे व असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे, या क्षेत्राच्या प्रकल्पांच्या औपचारिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात येते.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२०-२०२१ पासून १२६७ प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना ३६.३७ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी सन २०२४-२५ यावर्षी एकूण ५३८ लाभार्थ्यांचे प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून रक्कम रुपये १२.६७ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशु खाद्य निर्मिती प्रक्रिया इत्यादी प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेद्वारे सुमारे ३४६५ कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. कुंभार म्हणाले, सद्यस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातून आजअखेर १२६७ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा देशामध्ये दुसया क्रमांकावर आहे. त्यापैकी सन २०२४-२५ यावर्षी जिल्ह्यास ४७८ लक्षांक असून ५३८ साध्य असून सांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्ह्यात १२७२ वैयक्तिक लाभार्थी/ स्वयंसहाय्यता गट लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.