Last Updated on 12 Feb 2025 6:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
क्रीडा गणवेश दर्जा, क्रीडा मार्गदर्शक मानधन, प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय
मुंबई : शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात, असे निर्देश देत गणवेश दर्जा, प्रशिक्षक मानधन, भोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सहास पाटील, नवनाथ फडतारे उपस्थित होते.
क्रीडा मंत्री भरणे म्हणाले की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणे, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार देणे, अद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे काम या क्रीडापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापन, देखभाल दुरुस्ती, नवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जा, गुणवत्ता कायम राखावी, असेही निर्देशही दिले.
कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता
क्रीडा मंत्री भरणे म्हणाले, कोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. याबरोबरच आता फूटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचा, फुटबॉल खेळाडूंचा, फुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
खेळाडूंचे प्रमाणपत्र पडताळणी
कायाकिंग कनोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेश क्रीडा मंत्री भरणे यांनी दिले. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात उपाययोजना कराव्यात. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी या दिले.











































































