Last Updated on 18 Jan 2025 5:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सध्या सर्व काही माझ्याच हातात हवे, अशी वृत्ती वाढत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. त्यावेळच्या राजेशाहीतही त्यांनी लोकशाहीची बीजे रोवली आहेत,असे मत शिव व्याख्याते प्रशांत देशमुख (रायगड) यांनी राजारामनगर येथील व्याख्यानात बोलताना व्यक्त केले. यावेळी माजी जि.प.सदस्य ॲड. बाबासाहेब मुळीक (विटा) यांनी स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा दिला.
राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व आजची परिस्थिती’या विषयावर ते बोलत होते. माजी मंत्री आ.जयंत पाटील, माजी आ.सदाभाऊ पाटील,रयतेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड,राजारामबापू सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील,राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,जेष्ठ नेते दिलीपराव पाटील,प्रा. शामराव पाटील, नेताजीराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रशांत देशमुख पुढे म्हणाले,आपणास छत्रपती शिवाजी महाराज कळले आहेत का? आणि ते आपणास न कळल्यामुळे आपली आजची दुरावस्था झाली आहे काय? याचे आत्मचिंतन मराठी माणसांनी करण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजबाची सुरत लुटलीच आहे. शत्रूची सुरत लुटण्यात वावगे काय आहे? या लुटीत ही त्यांनी मोहनदास पारेख या दानशूर माणसाची पत्नी आणि मुलांचे रक्षण करण्या ची दक्षता घेतली आहे. त्यांनी शत्रूच्या मुलखातील महिलेस न्याय देताना सख्या मेहण्याचे हात-पाय कलम केले आहेत. राजांनी मावळ्यांना जीव लावला म्हणून ते जीवावर उदार होऊन लढले. राजांच्याबरोबर निष्ठेने काम केलेले तानाजी,येसाजी असे असंख्य मावळे अजरामर झाले आहेत. हे राज्य माझं आहे,ही भावना निर्माण केली होती.
ॲड.बाबासाहेब मुळीक म्हणाले,बापू कोणती ही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या २६ व्या वर्षी सार्वजनिक क्षेत्रात आले. त्यांनी स्कुल कमिटीचे चेअरमन व लोकल बोर्डचे प्रेसिडेंट म्हणून काम करताना शिक्षण,पिण्याचे पाणी व गावांना जोडणारे रस्ते आदी मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्याचे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी पाहताना राज्यात एकत्रित महसूल कायदा आणला,तर वीजमंत्री म्हणून काम जबाबदारी पाहताना राज्यात गावोगावी वीज नेण्याचे काम केले. त्यांनी उद्योगमंत्री पद भूषविताना राज्यात प्रथम औद्योगिक धोरण राबविले आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करताना ज्यांच्यावर शिक्का नाही,अशा कार्यकर्त्यांना शोधून त्यांना ताकद दिली आहे. आजच्या परिस्थितीत स्व.बापूंच्या विचाराने जिल्ह्यात काम करताना नव्या चेहऱ्याच्या आणि दमाच्या कार्यकर्त्यांचे संघटन वाढवावे लागेल. सांगली जिल्हा पाण्यासाठी स्वयंपूर्ण होत आहे,त्याचा पाया स्व.बापूंनी घातला आहे.
याप्रसंगी मनोज शिंदे (म्हैसाळ),आनंदराव नलवडे,माजी सभापती किसन जानकर, संग्राम देशमुख (माहुली), भिमराव पाटील, बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव,संजय पाटील,सुनिता देशामने,संग्राम जाधव,संभाजी जाधव यांच्यासह राजारामबापू समूहातील कार्यकर्ते,कामगार व अधिकारी उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#ShivajiMaharaj #Decentralization #Leadership #PrashantDeshmukh #History #Lokshahi











































































