Last Updated on 06 Dec 2024 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अकोले । ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मधुकर पिचड यांच्या निधनामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मधुकर पिचड हे राज्याचे माजी मंत्री होते. अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच मधुकर पिचड यांनी अनेक महत्वाची पदे भुषवली आहेत. तसेच आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून देखील कार्यभार त्यांनी पाहिला होता. अकोले तालुक्यामधील विकासात मधुकर पिचड यांचं महत्वाचं योगदान मानलं जातं. दरम्यान, २०१९ मध्ये मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी चार वाजता त्यांच्या अकोले तालुक्यातील राजूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी देवठाण, अकोले शहरातील अगस्ती महाविद्यालय येथे तसेच राजूर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता गमावल्याची भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
दिवंगत पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास 35 वर्ष प्रतिनीधीत्व केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी विधानसभेत नेहमीच मांडले. आदिवासी बहुल अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील ते नेहमी प्रयत्नशील राहिले.
मी मुख्यमंत्री असताना काही महिन्यांपूर्वी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी भागातल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. आपल्या प्रकृतीची चिंता न करता मधुकरराव या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यातून त्यांची आदिवासी बांधवाविषयीची तळमळ दिसून येते, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी बांधव, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी बांधव, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबिय, कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.











































































