मुंबई । नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. गौरव पदक, रोख रक्कम पंचवीस हजार, स्मृतीचिन्ह,शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जब्बार पटेल यांच्या हस्ते वितरण होणार आहे.
गेल्या वर्षी हा पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना देण्यात आला होता.नाट्यक्षेत्रात हा पुरस्कार अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जातो. मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री तसंच नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात सुहास जोशी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
सुहास जोशी या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. अनेक वर्षे त्यांनी मराठी नाटके, चित्रपट, हिंदी चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 25 मराठी नाटके, अनेक हिंदी आणि मराठी दूरदर्शन मालिका, मराठी – हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. झिम्मा आणि झिम्मा-2 या दोन्ही चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. या प्रवासात आतापर्यंत त्यांना झी गौरव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेअर अशा अनेक संस्थातर्फे जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नाट्य दर्पण, मराठी ग्रंथ संग्रहालय, व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार याही पुरस्कारांचा समावेश आहे. गेली काही वर्षे त्या लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्ग चालवत आहेत.