Indian Railways : आगामी काळात येणाऱ्या नवरात्र, दिवाळी आणि छटपुजा या सणांसाठी प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेनं ६ हजार विशेष गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत या विशेष गाडया धावणार आहेत.
दरवर्षी सणासुदीच्या काळात लाखो प्रवासी रेल्वे गाडयांमधून प्रवास करत असल्यानं त्यांच्यासाठी विशेष गाडया सोडले जातात. गेल्या वर्षी या काळात ४ हजार ४२९ गाडया सोडण्यात आल्या होत्या. याशिवाय नेहमीच्या १०८ गाडयांना अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. यामुळे साधारण १ कोटींहून अधिक प्रवाशांची सोय होईल अशी अपेक्षा आहे.
दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ पूजा दरम्यान, अनेक रेल्वे मार्गांवर विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी तयारी केली आहे. आम्ही प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. आतापर्यंत एकूण ५ हजार ९७५ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ४ हजार ४२९ होती. यामुळे पूजेदरम्यान एक कोटीहून अधिक प्रवाशांना घरी जाण्याची सोय होणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक ट्रेनमध्ये डब्यांची संख्या वाढवणार
९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पूजा उत्सव (दुर्गा पूजा ) चालणार आहे. यावर्षी दिवाळी (दिवाळी ) ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल तर छठ पूजा ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी आहे. मागणी वाढल्यास विशेष गाड्यांची संख्या आणखी वाढवता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, सणासुदीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता १०८ गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडण्याबरोबरच या श्रेणीतील १२ हजार ५०० नवीन डबे बनवण्यासही मान्यता देण्यात आली आहे.