Last Updated on 30 Sep 2021 5:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
86
‘आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही,’ राजू शेट्टींचा इशारा
कोल्हापूर : येत्या १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. तसच यावेळी त्यांनी जागर एफआरपीचा,आराधना शक्तीस्थळांची या आंदोलनाची घोषणा देखील केली आहे. नवरात्रीपासून एफआरपीचे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ऊसाच्या एफआरपीसाठी घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच दसऱ्याला जेजुरी येथे मेळावा घेऊन आंदोलनाची सांगता होईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
साखर कारखानदार यांच्या मनात शेतकऱ्यांना चार पैसे देण्याचे नसल्यामुळे निती आयोगाला हाताला धरून एफआरपीचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. भाजपने एफआरपीचे तुकडे करण्याचे काम केले आणि तेच पुण्यात आंदोलन करत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
ऊस तुटल्यावर १४ दिवसात ६० टक्के एफआरपी त्यानंतर पुढच्या १४ दिवसात २० टक्के एफआरपी आणि त्यानंतर दोन महिन्यात २० टक्के एफआरपी द्यावी अशी शिफारस केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. जर आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला.
घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन ऊसाच्या एफआरपीसाठी आंदोलनाला सुरुवात केली जाईल. जोतिबा, अंबाबाई, बाळू मामा यांचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार. १९ ऑक्टोबर रोजी २० वी ऊस परिषद होणार असून कुणाची परवानगी मागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.’शेतकऱ्यांचा दसरा कडवट झाला तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही’असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि इतर घटकांचा शासन नुकसान भरपाईअभावी दसरा कडवट झाल्यास राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.तर तीन टप्प्यांत एफआरपी देण्याच्या शासन निर्णयाचं समर्थन करताना इंग्रजी वाचनाची चांगली शिकवणी लावावी, असा टोला शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांना लगावला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २० वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर 19 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.
जागर एफआरपीचा,आराधना शक्तीस्थळांची आंदोलनाचे तारीख-ठिकाण असे –
7 जोतिबा,अंबाबाई,बाळूमामा
8 औदुंबर,पंढरपूर,अक्कलकोट
9 तुळजापूर,लातूर
10 परळी वैजनाथ
11 पैठण, जामखेड
12 जामखेड, शिर्डी
13 नाशिक
14 भिमाशंकर,दगडूशेठ
15 जेजुरी बारामती











































































