Last Updated on 18 Dec 2023 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस निधी
नागपूर | शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने मागणीपेक्षा चारपट निधीची तरतूद केली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मूल्यांकन उशिरा झाल्यामुळे बहुतांश शाळा अनुदानापासून वंचित राहिल्यासंदर्भात सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असून शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या त्रुटींचे निराकरण करण्यास शासन प्रयत्नशील आहे. तसेच आलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
अनुदानास पात्र होणार नाही, अशा शाळांना स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर शाळा चालवाव्या लागणार आहेत. शालेय शिक्षणाला शिस्त लावून, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षण देशात गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिक्षण विभाग आता विद्यार्थ्यांना सोयीसुविधा निर्माण करून गुणवत्तेकडे विशेष लक्ष देत आहे. राज्याला देशात प्रथम क्रमांक आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सत्यजित तांबे यांनी चर्चेत सहभाग घेतला.











































































