Last Updated on 27 Nov 2023 9:05 AM by Sanjay Patil/Adhorekhit
आरोग्य मंत्रालयाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष;धास्ती नको
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेबाबतच्या उपाययोजनांचा ताबडतोब आढावा घेण्याचा केंद्र सरकारकडून सल्ला
नवी दिल्ली | अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ झाल्याबद्दल आलेले अहवाल पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुरेशी सावधगिरी म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा कृतिशील आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे,श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, मात्र कोणतीही धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचेही सरकारने सूचित केले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेबाबतच्या उपाययोजनांचा ताबडतोब आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये, मनुष्यबळाची उपलब्धता,रुग्णालयातील खाटा,इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लस,वैद्यकीय ऑक्सिजन,प्रतिजैविके,वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे,चाचणी संच आणि विविध वैद्यकीय उपचारात्मक रसायने,ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट आणि व्हेंटिलेटर्सची(जीव रक्षक प्रणाली) कार्यक्षमता,आरोग्य सुविधांमधील संसर्ग नियंत्रण पद्धती,या सर्व बाबींची मोठ्या प्रमाणात उपलब्धता यांचा समावेश आहे.
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ‘कोविड-19 च्या अनुषंगाने, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबाबत या वर्षाच्या सुरुवातीलाच देण्यात आलेली सुधारित देखरेख धोरणांसाठीची परिचालनात्मक मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा सल्ला आहे.यात इन्फ्लूएन्झा (ILI) आणि तीव्र स्वरुपाचे श्वसन आजार (SARI), या सारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या श्वसनरोग जनकांच्या एकात्मिक देखरेखीची तरतूद आहे. या संसर्गांच्या वाढीवर,एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे (IDSP), जिल्हा आणि राज्य विभाग,बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे.यात लहान मुले आणि नवजात अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा समावेश आहे.
ILI/SARI च्या माहितीचा तपशील, IDSP- IHIP पोर्टलवर टाकणे आवश्यक आहे.वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांसह सार्वजनिक आरोग्य संस्थांनी हे विशेष करून, करायचे आहे.SARI ग्रस्त रूग्णांच्या (विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुले) नाक आणि घशातील स्त्रावांचे नमुने श्वसन विकार जनकांच्या चाचणीसाठी,राज्यांमध्ये असलेल्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास, राज्यांना सांगितले आहे.या सावधगिरीच्या आणि कृतिशील सहयोगात्मक उपायांच्या अंमलबजावणीचा एकत्रित परिणाम,कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अपेक्षित आहे.
अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार,चीनच्या उत्तरेकडील भागात श्वसनविकारात वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत.संघटनेने चिनी अधिकार्यांकडून अतिरिक्त माहिती मागितली आहे आणि सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या धोक्याच्या इशाऱ्याची गरज नाही असे अनुमान काढले आहे.











































































