Last Updated on 28 Oct 2023 8:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लातूरात तुपकरांनी घेतली शेतकऱ्यांची बैठक
लातूर । राज्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्याशी लातूरातील आदित्य लॉन्स येथे बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.सोयाबीन-कापूस-ऊस प्रश्नी आर-पारची लढाई उभारण्याचा निर्धार या बैठकीत रविकांत तुपकरांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाची मागणी खूप महत्वाची आहे,त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोतच,पण त्याचबरोबर सोयाबीन-कापूस-ऊसाला रास्त भाव मिळावा, ही मागणीसुद्धा तितकीच महत्वाची आहे. कारण बहुतांश मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे शोषण झाले म्हणूनच मराठा समाजाचा आर्थिक स्तर खाली गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासोबतच सोयाबीन-कापसाला भाव मिळणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी माझा विदर्भ-मराठवाड्याचा दौरा सुरू आहे. त्या अनुषंगाने आज लातूर जिल्ह्याचा दौरा होता. परंतू विश्राम भवनावर काही मराठा आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भावनांचा मी कायम आदर करतो. मराठा आरक्षणाचा लढ्यात आम्ही ताकदीने सहभागी आहोत.
त्याचबरोबर सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.सोयाबीन-कापसाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे, येलो मोझँक,बोंड अळी व पावसात खंड पडल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई व सोयाबीन प्रति क्वि.९००० /- रुपये व कापसाला प्रति क्वि. १२,५०० /- रुपये भाव, संपूर्ण कर्जमुक्ती, वन्यप्राण्यांपासून संरक्षण यासह अन्य मागण्यांसाठी आमचा लढा असून यासाठी यावर्षी आर-पारची लढाई उभारणार आहे. त्याअनुषंगाने १ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून एल्गार रथ यात्रेला सुरवात करणार असून २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार महामोर्चा काढणार असल्याचे रविकांत तुपकरांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी सत्तार पटेल,अरुणदादा कुलकर्णी,राजेंद्र मोरे, नवनाथ शिंदे प्रहराचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौघुले, छावा संघटनेचे नेते सीदाजी जगताप, ॲड.सचिन धवन,महेश पाटील, राजू कसबे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.











































































