Last Updated on 17 Sep 2022 3:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
आजकाल धकाधकीच्या जीवनात माणसाचे स्वास्थ्य हरवून गेले आहे. जीवनात अनेकविध ताण-तणावामुळे माणूस अंतस्थस्तः काहीसा एकटा एकाकी पडत चाललेला दिसून येतो.या साऱ्यावर एकच उपाय असतो आणि तो म्हणजे आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासणे,त्यात आपले मन गुंतवून ठेवणे.पण त्याच्या जीवनातील इतर व्यापामुळे, इतर प्राधान्यक्रमामुळे तो या साऱ्यापासून दूर जात असल्याचे दिसून येते.खरेतर मनात आपला छंद,आपली आवड-निवड जोपासावी असे त्याला वाटत असते,त्यासाठी मन अस्वस्थ ही असते..पण बऱ्याचदा त्याला तशी संधी मिळत नाही.हीच उणीव जाणवली आणि व्यापात दूर सारलेली नाटकाची आवड पूर्ण करण्यासाठी काहीजण एकत्र आले.निमित्त झाले ते इस्लामपूर येथील जयंत करंडक,एकांकिका स्पर्धेचे..,आणि स्थापन झाला नटरंग ग्रुप, इस्लामपूर.
![]()
![]()
नोकरी करणारे, व्यावसायिक, निवृत्त जीवन व्यतीत करणारे, गृहिणी आणि विद्यार्थी असे सर्व थरातील, सर्व वयोगटातील ‘ नाटकाची आवड ‘ हा समान धागा असणारी एकत्र आली… आणि ‘तिचे युद्ध’ ही पहिलीवहिली एकांकिका बसवली. पहिलाच प्रयोग झाला तो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला इस्लामपूरच्या ‘वाचन चळवळी’ च्या सौजण्याने..
![]()

![]()
लष्करातील जवानांच्या कुटुंबियांच्या व्यथेला वाचा ‘दृकश्राव्य’रूप देणारी ही एकांकिकेचे नंतर राजाराम बापू नाट्यगृह,इस्लामपूर सह अनेक ठिकाणी प्रयोग झाले…हुरूप आला,आपण काहीतरी करू शकतो,आपण आवड,छंद जोपासण्याचा आनंद मिळवत असताना इतरांनाही, समाजालाही काही देऊ शकतो याचा आगळा-वेगळा आनंद मिळू लागला.प्रेरणा मिळू लागली,उत्साह शतगुणित झाला.आणि मग दुसरी ग्रामीण बाज असणारी एकांकिका बसवली.’लागीर’ तिला ही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.ग्रामीण बाजाची ‘गटुळं ‘ बसवली.तिचेही अनेक प्रयोग झाले.विशेष म्हणजे माणिकवाडी सारख्या गावातही प्रयोग झाला आणि रसिक मायबापांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
मग मनात आले.. दोन अंकी नाटक बसवूया…
‘तिचे युद्ध’चे दोन अंकी नाटक तयार केले ‘ती’चं युद्ध.. ९ जून ला ‘श्याम-संध्या सांस्कृतिक मंच’ च्या वर्धापन दिनानिमित्त, मंच च्या सहकार्याने ‘ती ‘चं युद्ध या दोन अंकी नाटकाचा प्रयोग राजारामबापू नाट्यगृहात झाला.विशेष म्हणजे या नाटकाला कर्नल सुरेश पाटील,सांगली जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुभेदार मेजर विजय पाटील.कोल्हापूर, सातारा,कराड येथील सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी,आजी -माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत हा प्रयोग झाला आणि संपूर्ण नटरंग परिवार भरून पावला.
![]()

![]()
आवड जोपासण्यासाठी सर्व समानधर्मी रंगकर्मींनी एकत्र येऊन सुरू झालेला हा ‘नटरंग’चा प्रवास लोग मिलते गये,कारवा बढता गया’ असा अनेकांना सामावून घेत पुढे चालूच आहे.
सरिता शिंगण,स्नेहा टिळे,ज्योत्स्ना कुलकर्णी,सुप्रिया साठे,जया हरिहर इत्यादी गृहिणी, वृंदा शिंगण, निनाद धर्मवीर,प्राजक्ता देशपांडे, इ. विद्यार्थी,सचिन थोरबोले सूरज शिंगण इ. व्यावसायिक यांच्याबरोबरच प्रसाद दिवाडकर,अमर माने इ. नोकरी करणारे अभिनय व बॅकस्टेज ची तर आनंदहरी लेखन-दिग्दर्शनाची आपली आवड जोपासत आहेत तर लेखन- दिग्दर्शन-अभिनय या तिन्ही आघाडीवर आघाडीला असणारे अमृत शिंगण या साऱ्याचे नेतृत्व करत आहेत.
‘ नटरंग’,इस्लामपूर ‘ हे नाव काही काळातच रंगभूमीवर अढळ ध्रुव ताऱ्यासारखे दिसू लागले तर त्यात नवल वाटणार नाही हे नक्की !
![]()











































































