नाणी,नोटा,काढीपेटया संकलित करण्याचा छंद : 1 हजार डॉलरपासून अगदी १ अण्यापर्यंतची दुर्मिळ नाणी
समाजामध्ये हर प्रकारची माणसं बघायला मिळतात.आपले जीवन जगत असताना काहीजण आपले छंद जोपासत असतात.तर काही समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षित असतात.तरीही त्यांच्याकडेदेखील अनेक चांगले गुण असतात.असाच एक म्हणजे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील मनोज रंगराव भोसले हा युवक! मनोज म्हणजे शहरातील अनेकांचा परिचित चेहरा.शहरात मनोजला कोण ओळखत नाही असे नाही.अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण त्याला हाक मारल्याशिवाय पुढे जात नाहीत.अशा या मनोजलादेखील काही छंद आहेत.निसर्गप्रेमी,प्राणीमित्र अशी काही त्याची वैशिष्टये! त्याला जुनी नाणी,काडेपेट्या संकलित करण्याचा छंद आहे.
अनेकजण वडिलोपार्जित राजकीय,शैक्षणिक वारसा जोपासतात,पण मनोज याने वडिलोपार्जित नाणी,कड्यापेट्या,दुर्मिळ तांब्याची भांडी,चित्रे संकलित करण्याचा छंद जोपासला आहे.मनोजचे वडील ट्रक ड्रायव्हर होते.त्यांना नाणी,नोटा संकलित करण्याचा छंद होता.त्यांच्या निधनानंतर त्या नाण्यांची बॅग मनोजच्या हाती लागली आणि त्याने वडिलोपार्जित छंद पुढे चालू ठेवण्याची जिद्द बाळगली.पाचवी शिकलेल्या मनोजकडे सध्या मलेशिया,भूतान,भारत, इंडीनेशिया,चीन,पाकिस्तान,श्रीलंका,नेपाळ देशातील सुमारे ३०० नाणी व नोटा आहेत.1 हजार डॉलर पासून अगदी १ अण्यापर्यंतची दुर्मिळ नाणी त्याच्याकडे आहेत.
त्याच्याकडे सुमारे ९ हजार वेगवेगळ्या काड्यापेट्यांचा संग्रहही आहे.विविध कंपन्यांचे शीर्षक,प्राणी,वाहने, फुले आदींची छायाचित्रे दर्शनी भागावर आहेत.१९७५ पासूनची वृत्तपत्रे,पुरांची छायाचित्रे,दुर्मिळ पुस्तके,छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रेही संकलित आहेत.याशिवाय मनोजला समाजसेवेचीही आवड आहे.वृक्षांची जोपासना हा त्याचा आवडता छंद! मध्यंतरी त्याने पोपट पाळला होता.तो पोपट गाणी म्हणत असे.पण, तो पोपटही त्याच्यापासून कोणीतरी हिरावून नेला.एखाद्या मयतप्रसंगी व इतर सुखं-दुःखाच्या वेळीही तो मदतीला धावून जातो.एखाद्याने काम सांगितले की नाही शब्द त्याच्याकडे नसतो.चुटकीसरशी काम हातावेगळे करतो.त्याला व्यवहारज्ञान कमी असा अनेकांचा समज.पण,त्याला शहरातील राजकारणाची खडा न खडा माहिती असते.
शहराचे काय घेवून बसलाय,राज्यापासून ते मोदी सरकारच्या योजना तो अनेकांना ठासून सांगतो.तो कोणाचाही समर्थक नाही.पण,मोदी सरकारच्या चांगल्या योजनांचा तो छोटा प्रचारकच म्हटलं तर वावगं ठरणार नाही.लोकांमध्ये बोलायला संधी मिळाली की तो आपलंच कसं खरं आहे हे तो रेटून सांगतो. काही लोक त्याची गम्मत,चेष्टा करतात यावर त्याचे उत्तर तयार असते.देवानं त्यांना बुद्धीच तेवढी दिली आहे,त्याला काय करायचे म्हणून तो विषय तेथेच सोडून पुढे जात असतो.कोणतेही कष्टाचे काम करायला तो मागेपुढे बघत नाही.असा हा मनोज लोकांच्या दृष्टीने दुर्लक्षित असला तरीही त्याची तमा न बाळगता आपले छंद जोपासत असतो.