जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली
कोण होता ‘चेन्दरू मडावी’…विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी
एकदा भेळ खाता खाता रद्दी झालेल्या एका हिंदी वृत्तपत्रातली बातमी पाहिली.फोटो तोच होता आणि बातमीचे शीर्षक होते -‘दुनिया का असली मोगली. चेन्दरू अब नही रहा.’ त्याच क्षणात मनावर मोठा घाव झाल्याचा भास झाला.प्रवासात असूनही नेमका हा चेन्दरू कोण.याची उत्सुकता मनाला लागून गेली. गुगल मास्तरांच्या वाचनालयात याच चेन्दरू विषयी थोडी शोधाशोध केली तेंव्हा समजले अरे हा चेन्दरू तर जगातला एकमेव मोगली आहे.
एक आदिवासी मुलगा वाघासोबत खेळत असल्याचे फोटो अनेकवेळा सोशल मिडीयावर असलेल्या आदिवासी मित्रांच्या वॉल वर पहायला मिळायचे.फोटो पाहिला की असं वाटायचं-असेल एखाद्या चित्रपटातला’ म्हणून तो फोटो पाहून झालं कि दुर्लक्ष व्हायचं.
भारतातल्या एका आदिवासी गावातला आणि आदिवासी कुटुंबातला लहानसा मुलगा चेन्दरू त्याचा एक मित्र वाघ टेंबू.चेन्दरू आणि टेंबू च्या मैत्रीने पूर्ण प्रांतात नाव लौकिक मिळवला.ह्याच मैत्रीने नंतर जगाची सफर केली! स्वीडन येथील आर्नेस डोर्फ या चित्रपट निर्मात्याने टेंबू आणि चंदरूच्या मैत्रीवर चित्रपट काढून ऑस्कर पुरस्कार मिळवला.जगाने आर्नेस डोर्फ यांना कायम आठवणीत ठेवले.मात्र ज्या चेन्दरूने आर्नेस डोर्फ यांना जागतिक ओळख दिली त्या चेन्दरूला भारतातच कुणी ओळखत नव्हते.चेन्दरूची आठवण भारतीयांना झाली तेंव्हा मात्र चेन्दरू जग सोडून गेला होता.
जगातली सर्वात मोठ्या आणि महान असलेल्या आदिवासी संस्कृतीत चंदरू चा जन्म झाला होता.डोंगर दऱ्या आणि नद्यांनी वेढलेल्या बस्तरच्या जंगलांनी त्याचे पालनपोषण केले.जंगल ही आदिवासींची आई आहे तर त्या जंगलात राहणारे सर्वच प्राण्यांना भाऊबंद मानतात.आपल्या दिवसाची सुरुवात त्यांच्याकडून जंगलाची पूजा करून होते.जंगल आणि आदिवासींच्या या नात्याला ओळख दिली ती बस्तर च्या जंगलातील चेन्दरू याने.
चेन्दरू चे वडील आणि आजोबा खूप चांगले शिकारी होते.शिकारीसाठी रोज जंगलात जावे लागे,असेच एके दिवशी त्यांनी चेन्दरूसाठी एका मोठ्या टोकरीत भेट आणली.चेन्दरूला टोकरी उघडायला लावली.नक्कीच एखाद्या मोठ्या जनावराचे चवदार मटन असणार या उद्देशाने आनंदाच्या भरात चेन्दरूने टोकरी उघडली आणि त्यात त्याला वाघाचं लहानसं गोंडस पिल्लू दिसलं!
चेन्दरूने वाघाचं पिल्लू हातात घेतलं आणि वाघाच्या व माणसाच्या मैत्रीच्या एका अतूट धाग्याची गुंफण तयार झाली.प्राणी आणि मानवाच्या मैत्रीची सुरुवात झाली.चेन्दरू,चेन्दरूची बहिण आणि टेंबू एकत्र एकाच पत्रावळीवर जेवण करायचे.वाघाने माणूस मारल्याचे अनेक वेळा वाचनात येते,मात्र वाघाने माणसासोबत बसून माणसाच्या पंगतीतले जेवण खाल्ल्याची जगातली ही पहिलीच घटना असावी.
टेंबू मोठा झाला होता.त्याच्या खाण्यात वाढ झाली होती.चेन्दरू टेंबूसाठी मोठमोठे मासे मारून आणायचा.टेंबू मोठ्या थाटात ते मासे खायचा.अश्या या निर्मळ मैत्रीची चर्चा कशी कुणास ठाऊक साता समुद्रापार गेली.एक दिवस बस्तरच्या या जंगलात चेन्दरूच्या घरासमोर गोऱ्या लोकांच्या गाडयांचा ताफा येऊन थांबला.मोठमोठ्या मशीन, कॅमेरा घेऊन आलेल्या.लोकांनी चेन्दरूला घेऊन चित्रपटाचे शूटिंग सुरु केले.चित्रपटाचे नाव होते ‘दि जंगल सागा’.
बस्तरच्या जंगलातील आदिवासींना घेऊन चित्रित केलेल्या या चित्रपटाने जगभरात धुमधडाका करून टाकला होता.जगभरात चेन्दरू हिरो झाला होता.त्याला बघायला लोक उतावळे झाले होते.भारतात मात्र या गोष्टीची गंधवार्ता देखील नव्हती.चित्रपटात 2 रुपये रोजाने काम करणारा चेन्दरू सुपरस्टार झाला होता. बस्तरच्या जंगलातील माडिया गोंड या आदिवासी जमातीचा हिरो चेन्दरू मडावी.
जगभर लोकांनी या फिल्मला डोक्यावर घेतले होते.आता लोकांना या फिल्म मधील हिरो ला भेटायचे होते, जवळून अनुभवायचे होते.लोकांच्या आग्रहास्तव आर्नेस डोर्फ यांनी चेन्दरूला स्वीडनला नेले.स्वीडनला तिथे काळा हिरो म्हणून संबोधले गेले.चेन्दरू एक वर्षभर आर्नेस डोर्फ यांच्या घरी राहिला.वर्षभर स्वीडन च्या लोकांनी चेन्दरूला पाहिले आणि चेन्दरूने स्वीडनचे दर्शन केले.चित्रपट आणि दिग्दर्शक चेन्दरूच्या छायेत श्रीमंत झाले होते.मात्र चेन्दरू तसाच रिकाम्या हाताने मायभूमीत परत आला.चित्रपटाच्या लोकप्रियतेचा एक टेंबू काही दिवसातच जग सोडून गेला.
चेन्दरूने बस्तरच्या आदिवासी परंपरेनुसार आयुष्याच्या मार्गावरचा जोडीदार गोटुल मध्ये निवडून लग्न केले.स्वप्नाच्या दुनियेतून चेन्दरू बाहेर आला होता.आता त्याला पोटाची खळगी भरायला धडपड करावी लागत होती.संघर्ष करावा लागत होता.चेन्दरू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कच्च्या कुडाच्या घरात राहिला.जगात हिरो ठरलेल्या चेन्दरूचा ‘दि जंगल सागा’ हा चित्रपट 40 वर्षांनंतर बस्तरच्या आदिवासींनी पाहिला.
चेन्दरूच्या बायकोला पटले नाही की आपला नवरा कधी सुपरस्टार होता.40 वर्षानंतर गावातील व परिसरातील लोकांनी हा चित्रपट पहिला,मात्र चेन्दरू ने तो चित्रपट पाहिला नाही.त्यावेळी चेन्दरू जुन्या आठवणीत गरीबीचे ओझे पाठीवर घेऊन अंधारात रडत बसला होता.
माणसाच्या आणि प्राण्याच्या मैत्रीचा आदर्श नमुना ठरलेला आणि चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहचलेल्या चेन्दरूला आजारपणात उपचारासाठी न्यायला देखील पैसे राहिले नाहीत.शेवटी 18 सप्टेंबर 2013 ला या आदिवासी सुपरस्टार आणि जगातल्या एकमेव मोगलीने वयाच्या 78 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
कुणी आपला शेवटचा श्वास घेतला तर त्याच्यासाठी श्रद्धांजली वाहणाऱ्या लोकांची स्पर्धा लागते.मात्र वाघाच्या आणि माणसाच्या मैत्रीचा संदेश जगाला देणाऱ्या चेन्दरू बद्दल कुणी साधा एक शब्दही काढला नाही की कुणाला सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्याची गरजही वाटली नाही.
प्रसिद्धी मिळवून देखील दारिद्र्याने त्याची पाठ सोडली नाही. करोडो डॉलर आणि शेकडो पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटाचा हिरो शेवटी उपाशीपोटी जग सोडून गेला…!
संतोष द पाटील यांच्या facebook वॉलवरून साभार
One Comment
Сочный кунилингус в колготках для моей девушки
Hi thefe to all, hoow is everything, I thinhk everyy oone iis gettimg more from this site, annd your views arre good for neww people.