हिंगोली । कर्णकर्कश फटाका, सायलन्सरवर हिंगोली पोलिसांनी फिरवला रोलर हिंगोली शहर पोलिस वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत कर्णकर्कश, फटाका सायलन्सर मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले होते.
या सायलन्सरवर शनिवारी पोलिसांनी ‘रोलर’ फिरवला.यातून पोलिसांनी फटाका सायलन्सर वापरणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.हिंगोली शहरात दुचाकींना मॉडिफाय केलेले सायलन्सर लावून आवाज करत फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती.याचा रुग्णांना, स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. याला आवरण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार शहर वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला. तसेच मॉडिफाय केलेले फटका सायलन्सर काढून, दुचाकी चालकांना दंडही केला आहे. यात जवळपास १०० सायलन्सर जप्त केले आहेत. जप्त केलेल्या सायलन्सरचा पुनर्वापर होणार नाही, यासाठी शनिवारी सायलन्सरवर रोलर फिरवला.