‘प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल’मध्ये तिसरा पदवी प्रदान कार्यक्रम
सांगली । देशाच्या प्रगतीमध्ये जसे इंड्रस्ट्रीजचे मोठे योगदान आहे, तसे वैद्यकीय क्षेत्राचेही आहे. पण इंड्रस्ट्रीजकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते, वैद्यकीय क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही. यामध्ये व्यावसायिकता आली तर आपल्याकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. डॉक्टरांकडे परमेश्वर म्हणून पाहिले जाते. या परमेश्वराच्या हातून प्रामाणिक सेवा होणे आवश्यक आहे, असे मत न्यू वृंदावन हॉस्पिटल पणजीचे संस्थापक डॉ. दिगंबर नाईक यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम.बी.बी.एस) च्या तिसऱ्या पदवी प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रकाश शिक्षण, आरोग्य, उद्योग समूहाचे संस्थापक व भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कराड अर्बन बँकेचे कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव नितीन भोसले-पाटील,व्यस्थापिकीय संचालक डाॅ.विजयकुमार पाटील, सत्यजित ग्रुपचे संस्थापक नामदेव पाटील उपस्थित होते.
डॉ. दिगंबर नाईक म्हणाले, जगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदलासह स्पर्धा वाढली आहे. वैद्यकीय क्षेत्राची सेवेमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येऊ लागले आहे. इतर क्षेत्रांकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते. मात्र वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही. डॉक्टर व वैद्यकीय सेवांमध्ये काम करणारा प्रत्येक घटक हा खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी परमेश्वर आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात, एम.बी.बी.एस. सारखी मोठी पदवी मिळवू रुग्णांची सेवा करुन रुग्ण व नातेवाईकांचे अश्रू पुसण्याचे काम तुमच्या हातून होणार आहे. अनेकांना आपण केलेल्या उपचारामुळे जीवदान मिळणार आहे. ज्यांनी तुम्हाला घडविले त्या आई-वडील, अध्यापक व ज्ञान दिलेल्या प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजला कधी ही विसरू नका.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, इस्लामपूरसारख्या शहरात मेडिकल कॉलेज सुरू करता आले. यामुळे महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी या शहरात येऊ लागले. त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबर समाजसेवक व उत्तम नागरिक घडविण्यासाठी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च काम करत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानदान व उपचार देणारे एक सक्षम शहर म्हणून भविष्यात या शहराची ओळख निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. आज विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असताना त्यांनी व्यावसायिकता न जपता कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून रुग्णांवर उपचार करावेत.समाजात चांगला माणुस म्हणुन ओळख निर्माण होईल असे काम करावे.
यावेळी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या अधिष्ठता डॉ.रोहिणी करंबेळकर यांनी स्वागत व प्रास्थाविक केले,प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर चे अधिक्षक डॉ.भूपाल गिरीगोसावी,डाॅ.जयदीप पाटील,डाॅ.ज्योत्सना वडेर,एल.आर.पी.काॅलेजचे प्राचार्य डाॅ.अभिमन्यु पाटील, डॉ. शिवानंद दोडमनी,डाॅ.संजय पाटील,डाॅ.निखील उरुणकर,पांडुरंग गायकवाड,किशोर खंडागळे,हिम्मत जाफळे,अभिजीत पाटील,सचिन मोरे,संतोष पाटील,संदीप पाटील, यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार वृषाली भंडारे यांनी मानले.