सांगली । वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला या आधीच्या पारंपरिक व व्यावसायिक पदवी- पदव्युत्तर शिक्षणाच्या अभ्यासक्रमाबरोबरच आता एम. सी. ए. (मास्टर कॉम्प्युटर एप्लीकेशन) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद(AICTE DELHI) यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सुरु असणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये या पदव्यूत्तर संगणक अभ्यासक्रमाची सुरवात होत आहे,अशी माहिती संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये बी.ए., बी.कॉम,बी.एससी, बी.सी.एस., बी.बी.ए., बी.सी.ए. तसेच पदव्युत्तर स्तरावर एम. कॉम. आणि डिप्लोमा इन टॅक्सेशन; असे अनेक अभ्यासक्रम सुरू असून संस्थेच्या याच कॅम्पसमध्ये आर्किटेक्चर, डी. फार्मसी., बी. फार्मसी असेही पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत, अशा पारंपारिक व व्यवसायाभिमुख तसेच तंत्र शिक्षण क्षेत्रातील सर्व शाखा एकाच कॅम्पस मध्ये सध्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसह सुरू आहेत. एमसीए हा नवीन अभ्रासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आय टी इंडस्ट्री मधील नोकरीच्या संधी वाढतील असे ॲड. पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – उपग्रह प्रणालीवर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलन…हे काम झाले सुरु
ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये 2008 मध्ये बीबीए, बीसीए हे नवीन विभाग सुरू झाले. गेल्या काही वर्षांपासून याच महाविद्यालयात एमसीए हा नवीन पदव्युत्तर कोर्स सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार संस्थेचे मानद सचिव ऍड. बी. एस. पाटील व याच संस्थेचे फार्मसी कॉलेज आर्किटेक्चर कॉलेज यांच्या मार्गदर्शनानुसार आज महाविद्यालयाला नवीन एमसीए ( MCA) कोर्स साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (दिल्ली)यांच्याकडून मान्यता मिळाली. त्याचबरोबर याच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून महाविद्यालयाच्या सध्याच्या बीबीए व बीसीए साठी देखील मान्यता मिळाली.
या पत्रकार बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए. एम. जाधव उपस्थित होते.या नव्या मान्यतेसाठी प्राचार्य डॉ. ए.एम. जाधव यांच्याबरोबरच आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्या स्मिता माने, एस.डी. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. जावरकर, उपप्राचार्य अमोल पाटील, अधीक्षक विजय बोंगाणे तसेच बीबीए, बीसीए विभागाचे कॉर्डिनेटर संतोष पाटील यांनी देखील परिश्रम घेतले.