मुंबई | भौतिकशास्त्रात एम्. एस्सी. (M.Sc.) करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआएफआर, कुलाबा) आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (मानखुर्द, मुंबई) यांच्याद्वारे होमी भाभा केंद्रामध्ये २७ मे ते १५ जून या कालावधीत ‘विज्ञान विदुषी’ हा तीन आठवड्यांचा निवासी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२०२४ सालच्या विज्ञान विदुषी (भौतिकशास्त्र) उपक्रमाचे उद्घाटन प्रा. वि. गो. कुलकर्णी सभागृह, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (टीआयएफआर), वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई ४०००८८ येथे सोमवार २७ मे २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता होणार आहे.
“मला भौतिकशास्त्र तर खूप आवडतं. पण त्यात पीएच्. डी. करायला मला जमेल का? मला संशोधन करता येईल का? सुरुवात कुठे करायची? माझ्यासारखीच आवड असलेल्या इतर विद्यार्थिनी मला कुठे भेटतील? ज्यांनी हे सारं यशस्वीपणे केलंय अशा “रोल मॉडेल” महिला संशोधक मला भेटतील का?”
भौतिकशास्त्रात एम्. एस्सी. (M.Sc.) करणाऱ्या विद्यार्थिनींना असे अनेक प्रश्न पडत असतात. अशा विद्यार्थिनींसाठीच टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआएफआर, कुलाबा) आणि तिचे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (मानखुर्द, मुंबई) यांनी २०२० पासून ‘विज्ञान विदुषी’ हा तीन आठवड्यांचा निवासी उपक्रम हाती घेतला आहे. २०२४ मध्ये हा उपक्रम होमी भाभा केंद्रामध्ये २७ मे ते १५ जून या कालावधीत आयोजित केला जात आहे.
या उपक्रमात एम्. एस्सी. स्तरावर प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातील ४६ विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यादरम्यान विद्यार्थिनींना भौतिकशास्त्रातील प्रगत अभ्यासक्रम शिकवले जातील आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करायला उत्तेजन दिले जाईल. त्याचबरोबर समस्या-उकलीमधून विचार प्रक्रिया विकसित करणे आणि भौतिकशास्त्रातील संशोधनाच्या संधींबाबत मार्गदर्शन या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येतील. उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना टाटा मूलभूत संशोधन संस्थेमधील (कुलाबा) प्रयोगशाळा आणि जीएमआरटीमधील (नारायणगाव, पुणे) रेडियो दुर्बीण पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थिनींना देशातील यशस्वी महिला वैज्ञानिकांबरोबर बोलण्याची, त्यांचे काम जाणून घेण्याची आणि त्यांच्याबरोबर संवाद करण्याची संधी मिळणार आहे.
सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशाच्या निरनिराळ्या भागांतून एम्.एस्सी.ला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि अध्यापकांनी त्यांना दिलेली शिफारस-पत्रे यांच्या आधारावर विद्यार्थिनींची निवड केली गेली आहे. उपक्रमातील विद्यार्थिनी गोवा ते त्रिपुरा आणि हरियाणा ते केरळ अशा देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून येणार आहेत.
भौतिकशास्त्रात पीएच्.डी.च्या संशोधनासाठी पुरुष संशोधकांबरोबर महिला संशोधकांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणे, असा हेतू या उपक्रमामागे असून त्यासाठीच टीआयएफआरने हे एक वेगळे पाऊल उचलले आहे. उपक्रमाबाबत अधिक माहिती https://vv.hbcse.tifr.res.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.