सांगली । महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासासोबत विद्यार्थिनींच्या मधील विविध कला गुण शोधून येणाऱ्या पिढीतून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार हिम्मत पाटील यांनी केले. इस्लामपूर येथे मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले,”कलेमुळे माणूस अमर राहतो म्हणून विद्यार्थिनींनी कलागुण जोपासले पाहिजेत ग्रामीण जीवनामध्ये खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी सापडतात त्या गोष्टीकडे बारीक नजरेने पाहिल्यास उत्कृष्ट साहित्य निर्मिती करता येते मी घडलो ते या कलेमुळेच”. त्यांनी ‘माती’ ही अस्सल ग्रामीण कथा कथन करून विनोदी व भावुक होऊन कथेचा रंग रूप सादर केला.
अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा .प्रा.सौ. अरुणादेवी पाटील होत्या.वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे, मानद सचिव ॲड. बी.एस.पाटील(आण्णा),सह सचिव ॲड.धैर्यशील पाटील (बाबा), प्राचार्य. डॉ.अंकुश बेलवटकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर यांनी केले. व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. मेघा विजय पाटील यांनी करून दिला व वार्षिक अहवालाचे वाचन डॉ. स्नेहल हेगिष्टे यांनी केले.
प्रा.सौ.अरुणादेवी पाटील म्हणाल्या, “मुलींनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः कमावते झाले पाहिजे, त्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, शॉर्ट टर्म कोर्सेस मधून आपण आपले आर्थिक स्त्रोत वाढवू शकतो”, तसेच विविध कोर्सेस च्या बाबतीत माहिती देताना त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट,सभेचे नियोजन आणि सूत्रसंचालन, मेहंदी कोर्स,ब्युटी पार्लर,शिवणकाम अशा कोर्सेस मधून तुम्ही स्वतःचे अर्थाजन करू शकता. तसेच महाविद्यालय सतत मुलींच्यासाठी काहीतरी नवनवीन उपक्रम राबवीत असते. त्याबद्दल महाविद्यालय व प्राध्यापक वर्ग यांचे विशेष कौतुक केले.
महाविद्यालयाकडून अत्यंत प्रतिष्ठेचा दिला जाणारा 30 वा ‘मालतीमाता पुरस्कार’ श्रीमती गौतमी सर्जेराव काळे यांना २५०० रुपये रोख शाल पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कला विभागातील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कु. आरती पाटील व वाणिज्य विभागातील कु. साक्षी गायकवाड यांना देण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा उत्कृष्ट संशोधन कार्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालय राबवित असलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानंतर विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या स्नेहसंमेलनास आजी-माजी विद्यार्थिनी ,पालक व शिक्षक संख्येने उपस्थित होते.लोकनृत्य, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, वारकरी नृत्य ,शिवगर्जना नृत्य आदी सांस्कृतिक कला सादर करून पालक व विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध केले. हा समारंभ राजारामबापू पाटील नाट्यगृह येथे संपन्न झाला.सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील -उपासे यांनी केले व प्रा. डॉ.राम घुले यांनी आभार मानले.