यवतमाळ | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण करण्यात आले.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKISAN) अंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकूण 21 हजार कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आला.राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे.
राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1 हजार 969 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा लाभ मिळाला.
हप्त्याची स्थिती कशी तपासायची ते जाणून घ्या
शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर PMKisan अंतर्गत लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल. यानंतर स्थिती, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची इतर माहिती भरा. शेवटी ‘Get Report’ बटणावर क्लिक करा. यानंतर शेतकऱ्याचा तपशील येईल. कस्टमर केअरला फोन करून शेतकरी त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन तुमची शिल्लक देखील तपासू शकता.