27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जातो.त्यानिमित्ताने…
संगणक क्रांतीच्या या युगात सगळी समीकरणे बदलत चालली आहेत. जीवनाविषयक मूल्य पण बदलत आहेत. त्याचं अवमूल्यन झालंय असंही म्हणता येणार नाही पण प्रगती प्रगती असं म्हणत आपण आपली शिल्लक मूल्य न जपता न जुमानता ,असंच चालत राहिलो तर, त्याचं अवमूल्यन व्हायला फारसा वेळ लागणार नाही.
एक काळ असा होता की,नुकतीच जन्माला आलेली पिढी त्यांच्या दोन पिढ्या मागं असलेल्या पिढीत रमून जात होती.नातवंडांची शाळा त्यांच्या आजी-आजोबां बरोबर दररोज आणि दिवसभर चालत होती. दिवसभर त्यांच्या शाळेत राहूनही नातवंड आणि आजी आजोबा दोघेही थकत नव्हते. दिवसभरात हे असं करायचं, ते तसं करायचं नाही, असं सांगताना संस्काराच्या सुगंधी कुप्याच त्या नातवंडांच्या जवळ रीत्या होत होत्या. आपण खात असलेल्या घासात एक घास चिऊचा, एक घास काऊचा , पण असतो ,ही गोष्ट इतकी बिंबलेली असायची की प्रत्येक गोष्टीत माझ्याबरोबर आणखीही कोण आहे याची खूणगाठ लहानपणी बांधून ठेवली जायची. पाणी वाया घालवू नये, अन्न वाया घालवू नये हे लहानपणी इतक्या वेळा सांगितलं जात असे की मोठेपणी या गोष्टी कोणी सांगण्याची गरज भासत नसे. आजी-आजोबा हे नातवंडांचं मुक्त विद्यापीठ होतं. आजी आजोबांच्या कथातून राम, कृष्ण, शिवाजी ही राजे मंडळी नातवंडांना भेटली. त्या गोष्टी ऐकताना मातृभाषेतल्या नवनवीन शब्दांची गाठ पडली.
आजी आजोबा आपल्या गोष्टीची सुरुवात एका नगरात …अशी करत असत. मग विचारलं जायचं, आजी नगर म्हणजे काय ग? मग आजी सांगत असे, आपलं गाव आहे ना त्यापेक्षा खूप मोठं गाव. गोष्ट संपेपर्यंत नातवंड असे किती शब्द विचारत असत आणि आजी त्यांना त्याचा अर्थ सांगत असे. त्यामुळे मोठेपणी खूप मोठा शब्दसंग्रह तयार होत असे. काळ बदलत चाललाय स्पर्धेचं युग आहे. आपण तात्पुरत्या समाधान शोधण्याच्या नादात अशाश्वत असलेल्या बऱ्याच गोष्टींच्या मागे धावतो आहे. संसाराला सुरुवात करत नवीन जीवाला जन्म देऊन त्याला स्पर्धेच्या जगात लगेच उतरवतो आहे. तो जीव थोडासा मोठा होतोय तोपर्यंत आपण त्याला जागेवरच पळायला शिकवतो आहे आणि सांगतो आहे तू असा जागेवर पळालास तर तू कुठे थोडा पुढे जाशील. या सगळ्या धडपडीत आपण महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल उचलतो ते म्हणजे त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देतो. काही दिवसातच या शाळेबरोबर त्याच्या शिकवण्या सुरू होतात. दिवसभर इंग्रजीत संवाद साधणारी ही मुलं मराठी शिकणार कधी? आई-वडिलांच्या बरोबर काही वेळा ती मोडकं तोडकं मराठी बोलत राहतात. आई वडील त्यांना फारसं सांगायच्या भानगडीत पडत नाहीत.कारण काही ठिकाणी आई-वडीलही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेले असतात. त्यामुळे तेही त्यांच्याशी इंग्रजीतच संवाद साधतात.त्यामुळे मुलांचं मराठी सुधारावे अशी त्यांना फारशी गरज वाटत नाही.आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण ही एखाद्या विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.त्यामुळे बऱ्याच पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेणे हा झाला आहे.
पालकांची इंग्रजी भाषेची नसलेली पार्श्वभूमी आणि मुलांचा एकूण बुद्ध्यांक या सगळ्यात शिकून बाहेर पडणारी नवी पिढी म्हणजे विशिष्ट गोष्टी भरून तयार केलेला एक यंत्रमानव असं काही अंशी म्हणता येईल.याउलट आजी आजोबांबरोबर वाढलेली पिढी खूपच भाग्यवान म्हणावी लागेल.त्यांच्या मोठे होण्याच्या काळात मराठी साहित्याला अक्षरशः बहर आला होता.शिवाजीराव सावंत,रणजीत देसाई,ना.स. इनामदार यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या त्या पिढीला त्या त्या काळात नेऊन ठेवत होत्या.अर्थात ती पिढी पण त्याबरोबर रममाण होत होती.कारण लहानपणीचे बाळकडू त्यांना त्यावेळी उपयोगी येत होते. शंकरराव खरात,दया पवार यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे दलितांचे वास्तव वाचायला मिळत होते.पु.ल. देशपांडे यांच्यासारखा चतुरस्त्र लेखक एकीकडे खळाळून हसवत असताना नकळत डोळ्यात पाणी उभे करत होते.त्याचवेळी गदिमांच्या रामायणानी मोहून टाकले होते.
गदिमा सांगतात अगदी तसंच रामायण घडलं असेल असं मनस्वी वाटत होतं.त्यात लहानपणी झालेल्या संस्काराचा भाग होता.त्या पिढीला कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,शांता शेळके,मंगेश पाडगावकर,आरती प्रभू,ग्रेस,सुरेश भट,शंकर वैद्य,वसंत बापट यांच्या कवितांनी वेगवेगळ्या प्रांतात भटकंती करून समृद्ध केलं होतं. मंगेश पाडगांवकर हयात असताना त्यांच्या गाण्याची टवटवीत पन्नास वर्षे अर्थात पन्नास वर्षाचा तेजस्वी शुक्रतारा त्यांना पाहायला मिळाला होता. नाटकाच्या जादुई दुनियेत कुसुमाग्रज,वसंत कानेटकर,जयवंत दळवी,पु .ल. देशपांडे यांनी या पिढीला खूप सुंदर दिवस दाखवले होेेेते.आजही या पिढीतले कित्येक जण नटसम्राटमधील स्वगत पाठ करून एकमेकांना ऐकवत असतात.
नुसती मातृभाषा नव्हे तर त्या त्या भाषेविषयी असलेला तो जिव्हाळा असतो.माणसाच्या भावना शेवटी मातृभाषेतच व्यक्त होतात ना… “
पुस्तकातली खूण कराया,
दिले एकदा पीस पांढरे!
पिसाहुन सुकुमार काहीसे,
देता घेता त्यास थरारे!!
“इंदिरा संत यांच्या कवितेतील या ओळी पुस्तकात खूण करून ठेवायला त्यांनी तिला एक पांढरं पीस दिले आहे.मोरपंखी नव्हे आणि रंगीत ही नव्हे,त्यांनी ते पांढरे पीस का बर दिल असावं? तिने सारं काही आठवून त्या पिसावर लिहून त्याला ते परत द्यावं म्हणून की काय? पीस खरंतर किती नाजूक,किती सुंदर पण त्याहून सुकुमार असलेलं त्याचं हृदय आणि त्यातल्या भावना यामुळे तर ते थरारत आहे का? कदाचित यापेक्षाही आणखी सुंदर अशी भावना कवियत्रीची असू शकते पण तिच्या या भावनेजवळ जाण्याची ताकद आपल्याला भाषेमुळेच आली ना?
“गेले द्यायचे राहून,
तुझे नक्षत्रांचे देणे.”
आरती प्रभूंच्या कवितेतील ही ओळ.कवीला प्रेयसी नक्षत्रासारखी वाटत असावी किंवा नक्षत्रासारखं सुंदरस देण प्रेयसीला द्यायचं राहून गेलं असावं.भान हरवून ठेवणारी ही ओळ.”प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यातील अभ्युदयाची आशा एकमेव!” एखाद्या माणसाचं आयुष्य सारांश रूपाने सांगायचं म्हणजे तसं अवघडच.कुसुमाग्रजांनी “प्रेम” ह्या एका शब्दानी श्रीकृष्णाला उलगडून दाखवल आहे. ही कविता किती वेळा म्हणली तरी मन भरत नाही.ज्ञानेश्वरांपासून गदिमा कुसुमाग्रजांपर्यंत कित्येक कवी लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केलय.त्यांच्या लिखाणाचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचायला हवा.आज संध्याछायेत असलेली पिढी मराठीतच शिकली तरी झपाट्याने झालेले बदल तिने छान आपलेसे करून घेतले.
आपल्या मातृभाषेबरोबर त्या पिढीने इतरही कित्येक भाषा आत्मसात केल्या.इंग्रजीवरही उत्तरोत्तर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला.कारण जगात भ्रमंती करताना इंग्रजी येण खूपच महत्त्वाचा आहे हे नाकारून चालणार नाही.पण तरीही शेवटी नवीन पिढीला ज्ञानदेवांची ओवी सांगावी वाटते की,जी ओवी नवीन पिढीने आत्मसात करावी.
“माझी मराठीचे बोलू कौतुके !
परी अमृता तेही पैजा जिंके ,
ऐसी अक्षरे रसिके मेळविन!!”