निसर्गरम्य ठिकाणी फिरायची इच्छा असेल तर महाराष्ट्रातील या निसर्गाचं वरदान लाभलेल्या या ठिकाणाला एकदा तरी आवर्जून भेट द्या.इथलं रम्य वातावरण आणि निसर्गरम्य पाहून तुमचं मन ताजंतवानं होईल.विशेष म्हणजे या ठिकाणी वाहनांना परवानगी नाही.
निसर्गाचं वरदान लाभलेले व प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झालेलं हे ठिकाण आहे बहे (ता.वाळवा) येथील तीर्थक्षेत्र रामलिंग बेट!
कृष्णा नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला हा भुप्रदेश निसर्गप्रेमींसाठी वरदान ठरला आहे त्यामुळे या बेटाला केवळ धार्मिक स्थळ म्हणुनच नाही तर एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणुन अनन्यसाधारण महत्व आहे.
इस्लामपूर पासून १० कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे ७ कि. मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे बेट वसलेले आहे.
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामलिंग बेटावर राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झालेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहे रामलिंग बेटावर तरुण-तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे.विशेषकरून शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.याठिकाणी मुंबई आणि पुण्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटक वीकेंड ट्रिपसाठी आवर्जून येतात.
बहे गावच्या पश्चिमेस असणारे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो.या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
‘रामलिंग बेट’ हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १ कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे.कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे.धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात.
मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत,त्यावरून चालत जाता येते.मंदिराच्या परिसरातील वड,चिंच व इतर झाडे यांची थंडगार सावली आहे.तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो.रामलिंग बेटावर सर्वात उंच अशा मध्यभागी प्रभू श्री रामाचे मंदिर असून ते सर्वात पुरातन आहे.प्रभू रामचंद्र हे वनवासाच्या काळात हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिव शंकराची पूजा केली म्हणून यास रामलिंग असे म्हणतात.
येथे संथ वाहणारे कृष्णेचे पाणी बोडक्या दगडावरून वाहते.मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत, त्यावरून चालत जाता येते.याचा पुरावा श्रीधर स्वामी यांनी लिहलेल्या वाल्मिकी रामायणात आहे.पूर्वी येथे छोटे मंदिर असावे हल्लीचे राममंदिर हे १४ व्या शतकात बांधले आहे.मंदिरासाठी फक्त चुना व वीट याचा वापर केला आहे.गाभारा व शिखर वैशिष्टपूर्ण नक्षीकामामुळे सुशोभित आहे.अलीकडे पर्यटन खात्यामार्फत मजबुतीकरण झाले आहे.या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही असा इतिहास आहे.समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे.रामलिंग मंदिर व मारुती मंदिराचे बांधकाम केल्याचा पुरावा इ.स. १८८४ च्या बॉम्बे गेझेट मध्ये सापडतो.
हनुमान उपासकांची दर शनिवारी गर्दी
या बेटावर तरुण-तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे.जुन्या काळातील उंच बांधलेला पूल.त्याच्याखाली काळ्याशार बोडक्या दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते.छोट्या बंधाऱ्यावरून चालताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो.पावसाळ्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्यानंतर हा परिसर काहीकाळ पाण्याखाली जातो.पण,श्रावण महिन्यांत काही दिवसांचा अपवाद वगळता याठिकाणी भाविकांची गर्दी होती.पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबरनंतरचा कालावधी पर्यटनाकरिता जायला योग्य असतो.अनेक हनुमान उपासक शनिवारी येथे गर्दी करतात.
सिनेसृष्टीचे आकर्षण;.’प्री वेडिंग’ शूटसाठीही छायाचित्रकारांचा ओढा
बेटावर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.हा परिसर आता सिनेसृष्टीचे आकर्षण ठरत आहे.’प्री वेडिंग’ शूटसाठीही छायाचित्रकारांचा ओढा याठिकाणी वाढला आहे.रामदुत फौंडेशनचे ‘स्वच्छता दुत’ येथील स्वच्छता राखण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.