मुंबई । राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय ठरला आहे.राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निकाल दिला.या निकालात शिंदे गटाला दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.
नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले.सुनावणीवेळी ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, अंबादस दानवे, वैभव नाईक, सुनिल शिंदे तर शिंदे गटाचे राहूल शेवाळे, मंगेश कुडाळकर,भरत गोगावले,बालाजी किणीकर,संजय शिरसाठ उपस्थित होते.
शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च आहे. फक्त पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकत नाही, असं सांगताना पक्षप्रमुखच अंतिम निर्णय घेऊ शकतात,हा ठाकरे गटाचा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला.
दोन्ही गटांकडून शिवसेनेची घटना मागवून घेतली होती.उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नव्हती,म्हणून त्यांनी दिलेली घटना वैध नाही.1999 साली निवडणूक आयोगात दाखल केलेली घटना वैध आहे.2018 साली घटनेत केलेले बदल निवडणूक आयोगाला न कळवल्याने ते बदल देखील वैध नाहीत.त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेची प्रत ही शिवसेनेची खरी घटना आम्ही ग्राह्य धरली आहे.पर्यायाने ठाकरेंनी दिलेली घटना वैध नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
हा निकाल देतांना नार्वेकर म्हणाले की, दोन्ही गटांकडून घटना मागितली गेली. पण, दोन्ही गटांनी ती दिली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करण्यात आली.2018 साली केलेली घटना ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे 1999 साली केलेली घटना मान्य केल्याचेही त्यांनी निकाल देतांना सांगितले. त्यानंतर त्यांनी हा निकाल दिला.
शिवसेनेत दोन गट पडले हे 22 जून रोजी लक्षात आले. खरी शिवसेना ठरवण्याचे अधिकार माझेच असेही ते म्हणाले. अपात्रतेचा निर्णय देण्या अगोदर शिवसेना कोणाची याचा निकाल त्यांनी दिला. यावेळी दोन्ही घटनांचे विश्लेषण करण्यात आले.त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय़ अंतिम आहे. पक्षप्रमुखांचे मत अंतिम हे मान्य करता येणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही असेही सांगितले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला. सुमारे 200 पानांचा एक निकाल सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे.सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश आज वाचण्यात आला.