स्व-सक्षम फौंडेशनतर्फे स्पर्धांचे आयोजन
राज्यातील १७ वर्ष वयोगटातील उत्कृष्ट दर्जाचे विविध फुटबॉल संघ सहभागी होणार
सांगली । इस्लामपूर येथील स्व-सक्षम फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा शुक्रवार (ता.२९) पासून सुरु होत आहे.महाराष्ट्रातून १७ वर्ष वयोगटातील उत्कृष्ट दर्जाचे विविध फुटबॉल संघ सहभागी होणार आहेत.तालुक्यातील फ़ुटबॉल प्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
इस्लामपूर येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहाच्या मैदानावर दिवस-रात्र स्पर्धा होणार आहेत.विजेत्या पहिल्या चार संघांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.शुक्रवारी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार प्रदीप उबाळे,पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.तर ३१ डिसेंबरला संध्याकाळी माजी मंत्री जयंत पाटील व उद्योजक गिरीष चितळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल.
या स्पर्धेत मुंबई,पुणे,अहमदनगर,बेळगाव,सातारा,सांगली,कोल्हापूर सह विविध संघ होणार सहभागी असतील.
राज्यातील नामवंत खेळाडू विविध संघातून खेळणार असल्याने विजेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघाना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
दर्जेदार संघाना निमंत्रित केल्याने फुटबॉल खेळाडूंना राज्यस्तरीय दर्जाचे सामने खेळण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील बेस्ट गोलकीपर,बेस्ट डिफेंडर, बेस्ट फॉरवर्ड व मॅन ऑफ द टूर्नामेंट अशी वैयक्तिक पारितोषिके दिले जाणार आहेत. तर विजेत्या प्रत्येक संघाला ट्रॉफी आणि मेडल्स दिली जातील
स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात लोकप्रिय अशा फुटबॉल खेळाकडे जास्तीत जास्त युवावर्ग आकर्षित व्हावा. खेळाडू मैदानावर उतरावेत व खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे महत्व जाणून घेऊन खेळाकडे करियरची संधी म्हणून पाहावे यासाठी स्व-सक्षम फौंडेशनचा प्रयत्न आहे.
अत्यंत चुरशीच्या सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी सर्व फुटबॉल प्रेमींनी ३१ डिसेंबर अखेर सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहन स्वसक्षम फौंडेशनने केले आहे.