सोलापूर । महाराष्ट्र शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या स्वरुपात लागू करण्यात आली आहे. त्याची अमंलबजावणी महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होऊ शकणारी नुकसानीची भरपाई मिळावी जेणेकरून बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा पहिल्या अपत्या करिता लाभ हा दोन टप्प्यात 5 हजार रुपये प्रदान केला जाणार आहे (पाहिलं हप्ता रक्कम रु. 3,000/- व दुसरा हप्ता रक्कम रु. 2000/- ).दुसरे अपत्य मुलगी झाली तर मुली विषयीच्या विचारामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी एकाच टप्प्यात 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने सामान लाभ मिळत असणाऱ्या महिलाना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे
मातेचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक, मातेचे आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक किंवा पोस्ट बँक पासबूक झेरॉक्स, ANC/RCH नोंदणी कार्ड व बाळाचे लसीकरण नोंदणी कार्ड, बाळाचा जन्म दाखला
वरील कागदपत्रासोबतच प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 करीताचे कागदपत्राची पुर्तता (खालील पैकी कोणतेही एक)
ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.८ लाख पेक्षा कमी आहे.
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती.
ज्या महिला 40 टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत.
बीपीएल शिधापत्रिका धारक महिला.
आयुष्मान भारत अंतर्गत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनांतर्गत महिला लाभार्थी.
ई श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला.
किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत शिधापत्रिका धारण केलेल्या महिला लाभार्थी
सदर योजनेची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी होणेकरीता दि. 18/12/2023 ते 22/12/2023 या कालावधीमध्ये लाभार्थ्यांच्या नोंदणीची विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासंबंधी जिल्ह्यातील पहिल्या खेपेच्या गरोदर माता (शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 510 दिवसातील ) म्हणजे जुलै 2022 पासूनच्या गरोदर माता त्याचप्रमाणे 1 एप्रिल 2022 नंतर दुसरी मुलगी अपत्य झालेल्या मातांची (लाभार्थ्यांची) नोंदणी शासकिय आरोग्य दवाखाना,कार्यालयामध्ये करणेत येणार आहे.तसेच लाभार्थी स्वत: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मोबाईल ॲप्लीकेशन द्वारे Self Registration (स्वत:ची नोंदणी) केंद्र शासनाच्या https://pmmvy.wcd.gov.in वरती जाऊन फॉर्म भरु शकतात किंवा सदरील साईट वर जाऊन मोबाईल ॲप डाऊनलोड करुन स्वत:चा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
फॉर्म नोंदणी व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) रक्कम जमा होईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका,आरोग्य सेविका/सेवक,अधिपरिचारीका,उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,नागरी भागाकरिता आरोग्य सेविका/सेवक,अंगणवाडी कार्यकर्ती/ सेविका,वैद्यकिय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महानगर पालिका भागामध्ये आशा स्वयंसेविका,आरोग्य सेविका,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या शिवाय जिल्हास्तरावरील आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,सोलापूर,जिल्हा शल्य चिकित्सक,कार्यालय,सोलापूर,व आरोग्यधिकारी, महानगर पालिका, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन श्रीमती मनिषा अव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. संतोष नवले,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद,सोलापूर,डॉ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक,सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.