सांगली । कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत वाळवा तालुक्यातील महसूल अभिलेख्यात आतापर्यंत एकूण ३ लाखांवर अभिलेखे तपासणी करण्यात आले.त्यामध्ये 13 हजार 285 कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली,त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले.
वाळवा तालुक्यातही कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम गतीने सुरु आहे.महसूल विभागाबरोबरच पंचायत समिती,शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस,भूमिअभिलेख आदी कार्यालयांमध्ये ही मोहीम सुरु आहे.
तालुक्यातील महसूल अभिलेख्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 03 हजार 531 अभिलेखे तपासणी करण्यात आले.त्यामध्ये 13 हजार 285 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.मराठी व मोडी मध्ये नोंदी आढळून आलेल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.महसूल विभागातील कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम 8-10 दिवसात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
वाळवा पंचायत समिती आणि शिक्षण विभागामध्ये आतापर्यंत 192 कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिली.