साहित्यिक योगदानाबद्दल ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे आणि कवी-लेखक एकनाथ पाटील यांचा होणार सन्मान
कोल्हापूर । रेंदाळ (जि. कोल्हापूर) येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने 2022 सालासाठीचे विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील ज्येष्ठ आणि उल्लेखनीय अशा दोन लेखकांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे आणि नव्या पिढीतील आश्वासक कवी-लेखक एकनाथ पाटील या दोघांची निवड करण्यात आली आहे.
नीलम माणगावे यांनी कथा, कादंबरी,आत्मचरित्र, बालवाड्.मय अशा विविध प्रकारांत संख्येने विपुल आणि लक्षणीय असे लेखन केलेले आहे.त्यांचे आतापर्यंत सुमारे सत्तरहून अधिक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या तीन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या लेखनातून स्त्रीत्वाबरोबरच जीवनविषयक विविध मूलभूत प्रश्नांचा शोध बघायला मिळतो.
तर एकनाथ पाटील हे नव्वदीनंतरच्या कालखंडातील महत्त्वाचे आणि एक आश्वासक कवी. ‘सत्वशोधाच्या कविता’, ‘खुंट्यांवर टांगलेली दुःखं’,’आरपार झुंजार’ हे तीन कवितासंग्रह आणि ‘1972 चा दुष्काळग्रस्तांचा लढा’,’जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने’,’कादंबरीच्या निर्मितीचा सूत्रशोध’, ‘युगानुयुगे तूच : संदर्भ आणि अन्वयार्थ’ इ. त्यांचे संपादित ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्याबरोबरच ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर – पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाटकाच्या एका भागाचेही लेखन त्यांनी केलेले आहे.
ग्रंथ पुरस्कारांत कविता या प्रकारासाठीचा पुरस्कार गोविंद काजरेकर (तळवडे, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांच्या ‘सुन्नतेचे सर्ग’ या कवितासंग्रहास जाहीर झाला . ‘कादंबरी’ या प्रकारासाठीचा पुरस्कार विलास कांतीलाल मोरे (एरंडोल, जि. जळगाव) यांच्या ‘पांढरे हत्ती, काळे दात’ या कादंबरीस, तर कथासंग्रहासाठीचा पुरस्कार सीताराम सावंत (इटकी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ या ग्रंथाला जाहीर करण्यात आला. रोख रक्कम रुपये तीन हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील सुमारे दीडशेहून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.
या पुरस्कार निवड समितीत डॉ. रफीक सूरज,डॉ. गिरीश मोरे आणि डॉ. गोपाळ महामुनी यांनी काम पाहिले.पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे वाचनालयाचे अध्यक्ष श्री. आर. एम. पाटील (सर) यांनी जाहीर केले आहे.