दीपावली उत्सव म्हणजे दीपोत्सव ! मानवी जीवनात मांगल्य व आनंद व प्रस्तापित करणारा सण. जीवनातील अंधःकार या दीपोत्सवाने कमी व्हावा यासाठी प्रत्येकजण कार्यरत असतो.आनंदमय, उत्साहपूर्ण व वैचारिक परिपूर्ण व्हावे, सद्गुणांची पूजा व्हावी.सत्कार्याला साथ रहावी, समाज जीवन शांततामय असावे याकरिता पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार नेहमीच सकारात्मक दृष्टीने घडामोडींचा वेध घेतात. ‘अधोरेखित’ या दीपावली अंकाद्वारे आपल्या समोर दर्जेदार साहित्य मांडताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.आपली भूमी ही संतांची,विद्वानांची आणि नेतृत्वाची भूमी म्हणून सुपरिचित आहे.‘अधोरेखित’ या दीपावली अंकाद्वारे दीपावलीच्या 5 दिवासांचे महत्व,देवांची दिवाळी,तुलशी विवाहाचे महत्व यासह अनेकविध माहितीचा खजिना तुम्हांला देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.आपली संस्कृती आणि अभिमान जपण्यासाठी ‘अधोरेखित’ नेहमी प्रयत्नशील राहील,अशी हमी आम्ही देत आहोत. ‘अधोरेखित’ परिवाराच्यावतीने सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !
संपादक,
अधोरेखित मीडिया नेटवर्क ॲण्ड मार्केटिंग
।।शुभ दिपावली ।।
मुहू्र्त दीपावली 2023
गुरुवार
दि.09/11/2023
अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )
वसुबारस-(अर्थात गोधनरुपी लक्ष्मीची पूजा)
गाईवासराचे सायंकाळी पूजन करावे
शुक्रवार
दि 10/11/2023
गुरुद्वादशी ,धनत्रयोदशी-धन्वंरी जयंती
यमदीपदान
अपमृत्यू येऊ नये म्हणून, खालील मंत्रांनी यमाची प्रार्थना करून दीप पूजन करावे
यम प्रार्थना मंत्र
मृत्यूंना पाशदंडाभ्यां कालेन: श्याम यासह ।
त्रयोश्यां दीपदानत् सूर्यज: प्रियतां मम॥
दीर्घायुषीआरोग्य लाभावे म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते. (‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
रविवार
दि.12/11/2023
दीपावली,नरकचतुर्दशी,अभ्यंगस्नान -चंद्रोदयी अभ्यंग स्नान करावे.
चंद्रोदय-पहाटे 5. 33
अपमृत्यू येऊ नये म्हणून यमतर्पण करून यमाची प्रार्थना करावी
प्रार्थना मंत्र
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः ।
भूताधिपोऽदत्त कृतानुसारि कृतांत एतत् दशभिर्जपंती ॥
लक्ष्मी-कुबेर पूजन
दुपारी 01.45 ते 03.10
सायंकाळी 06ते 08.50
रात्री -08.50 ते 11.00
शक्यतो सायंकाळी करावे.
मंगळवार
दि.14/11/2023
दिवाळी पाडवा,बलिप्रतिपदा,
साडेतीन मुहूर्तातील एक दिवस ,
वही आणि गोवर्धन पूजनाचा
आपल्या पतीला ओवाळून -पतीकडून ओवाळणी घ्यायचा दिवस
वहीपूजन मुहूर्त
मंगळवारी
पहाटे -02.30 ते 05.30
सकाळी -06.45 ते 7.35
सकाळी -10.55 ते दु .01.45
बुधवार
दि.15/11/2023
भाऊबीज (यमद्वितिया )
बहिणीतील अतुट नातं वृद्धिंगत करण्याचा दिवस .
बहिण आपल्या भावाला ओवाळते.
शनिवार
दि.18/11/2023
पांडव पंचमी (कडपंचमी )
तुलसी विवाह : शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023
देव दिवाळी : बुधवार, 13 डिसेंबर 2023
दिव्यांचा सण दिवाळी
भारतात साजर्या केल्या जाणार्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात.असे म्हटले जाते कि दिवाळी रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते.परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषणाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते.भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोध्या परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोध्या पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषणाई ने जगमगुन गेला होता. अशा प्रकारे त्या अंधार्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.दिवाळीला आम्रपर्णाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणार्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दिपोत्सव म्हणून ओळखली जाते.या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.पारंपारिक रिती पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात.दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ रोशणाईचा सण’ किंवा दिपोत्सव असा आहे. संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास दिपावली असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ दिव्यांची रांग असा केला जातो.भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.
दीपोत्सव उत्कर्षाचा
दिवाळी धनश्रीमंतांचं इमलेही उजळते आणि मनश्रीमंताचे दरवाजेही उघडते.दिवाळी बाहेरील तिमिराला प्रकाशमान तर करतेच; पण त्याबरोबरच आपल्या मनावर साठलेलं मळभ दूर करून प्रसन्नतेची,उल्हासाची ज्योत जागृत करते.दिवाळी या नावातच दिव्याचं अस्तित्व दिसतं.
पणत्यांचा लखलखाट, दारी आकाशदिव्यांचा थाट
दिवाळीसण दिव्यांचा, आणतो जणू चैतन्याची पहाट
लखलख चंदेरी चांदण्यांनी आकाशाचा निळा गाभारा सजलेला आहे. थंडीचा हलकासा अत्तरस्पर्श उन्हालाही मऊ-मुलायम बनवतो आहे. दिव्यांचा केशरी-पिवळसर प्रकाश अंधकार दूर करत आहे.प्रकाशाचा हा प्रसन्न उत्सव म्हणजेच दीपावली.दीपावली म्हणजे जीवनातला अंधार दूर सारून उजेडाला सामोरं जाण्याचा उत्सव, दीपोत्सवात घर-दार आणि देवघर जसं दिव्यांनी उजळायचं,तसंच अंतरीचे क्षीण झालेले दिवेही स्नेहाच्या फुलवातींनी उजळायचे, आपल्या आशा-आकांक्षाचं क्षितीज निरभ्र असलं, की मग अंतरीचं आकाशही उजळून तेजोमय होतं.
दिवाळी हा रोषणाईचा सण,लखलखत्या दिव्यांनी वातावरणातल्या अंधःकाराचं साम्राज्य दूर सारण्याचा, आयुष्य तेजोमय, प्रकाशमय आणि दिव्याच्या ज्योतीसमान पवित्र करण्याचा सण म्हणजेच दीपावली. प्रत्येक जागेतला कोपरा न् कोपरा प्रज्वलित करणारी व त्याचबरोबर आपल्यालाही त्या तेजात प्रकाशमान करून तेजोमय करणारी ही दिवाळी. दिवाळी हा तेजाचा उत्सव, आपल्या आतील प्रकाशाला म्हणजेच आत्मप्रकाशाला या बाहेरच्या प्रकाशानं जागृत करायचं.
उपनिषदांमधली प्रार्थना तमसो मा ज्योतिर्गमय; म्हणजेच अंधारातून मला प्रकाशाकडे; हाच संदेश दीपावली आपल्याला देते.अंधारातून प्रकाशाकडे जाणं जसं असतं,त्याचप्रमाणे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दुःखातून आनंदाकडे,नैराश्यातून उत्साहाकडे,अंधश्रद्धेतून विज्ञानाकडे,अनीतीकडून नीतीकडे,दुष्कृत्यातून सत्कृत्याकडे, असमाधानातून समाधानाकडे,गरीबीतून श्रीमंतीकडे जाणं असतं.दीपावली म्हणजेच दिव्यांचा उत्सव,प्रकाशाचा सण.
दीप्यते दीपयति वा स्वं परं चेति इति दीपः; जो स्वत: प्रकाशतो किंवा दुसर्यायाला प्रकाशित करतो तो दीप होय.पंचमहाभूतांतल्या तेजाचं प्रतीक म्हणजे दिवा मग तो लामणदिवा असो वा साधी पणती असो. दिवा हा अग्नीचं, तेजाचंच रूप. मिणमिणणार्या पणतीपासून ते झळाळत्या आकाशकंदिलापर्यत, समईच्या स्निग्ध ज्योतीपासून ते भुईनळ्यापर्यंत आणि आंघोळीच्यामध्ये केलेल्या औक्षणातल्या निरांजनापासून ते सप्तरंगाची बरसात करणार्या बाणापर्यंत सर्वत्र भरून राहिलेलं आहे, ते म्हणजे फक्त तेज आणि तेजच. दीपावलीच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात रमा एकादशी, गुरुद्वादशी (वसुबारस), आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरकचतुर्दशी), अमावस्या (लक्ष्मीपूजन), कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीज. अशा सप्तरंगाच्या ओळीत ही दीपावली येते. चौथ्या शतकातल्या पद्मपुराणात आणि सातव्या शतकातल्या स्कंद पुराणात दिवाळीचं वर्णन आढळतं.
दिवाळी धनश्रीमंतांचं इमलेही उजळते आणि मनश्रीमंताचे दरवाजेही उघडते.दिवाळी बाहेरील तिमिराला प्रकाशमान तर करतेच; पण त्याबरोबरच आपल्या मनावर साठलेलं मळभ दूर करून प्रसन्नतेची, उल्हासाची ज्योत जागृत करते. दिवाळी या नावातच दिव्याचं अस्तित्व दिसतं. साक्षात मृत्युदेवता यमानं धनत्रयोदशी ते यमद्वितीया या दिवसांमध्ये रोज दीपोत्सव केल्यास अपमृत्यू येणार नाही, असं सांगितलं आहे. म्हणूनच आपण पणत्या, आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करतो. हा सण प्रकाशाचा, आसमंत उजळून टाकणार्या पणत्यांचाच. पणती व तिची ज्योत हे एक सुंदर रूप आहे. घनदाट काळोखाला भेदण्याचं सामर्थ्य एवढ्याशा एका पणतीत असतं. आपल्या भोवतालच्या अंधार्या विचारांना, परिस्थितीला भेदण्याचं काम अंतर्मनातील एक छोटीशी पणती करू शकते, त्यासाठी हा दीपोत्सव महत्त्वाचा.
फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढाच दिवाळीचा अर्थ नाही, तर अंगणात लावलेल्या या दिव्यांनी आपल्या मनाचा गाभाराही उजळला पाहिजे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपल्या अंतरातला विवेकदीप उजळा, अविवेकाची काजळी झाडून टाका, दिवाळीत दीप महत्त्वाचाच, तो अंगणही उजळतो त्याचबरोबर आपलं मनही.
ज्ञानाचा दिवा सतत प्रज्ज्वलित ठेवून अज्ञान, अंधःकाराचा नाश करणं म्हणजेच खरी दीपावली साजरी करणं होय. दिव्याचं माहात्म्य श्री कालिका पुराणात भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं आहे,
श्रीदीपेन लोकान् जयति दीपतेजोमयः स्मृतः
चतुर्वर्गप्रदो दीपस्तस्माददीपं यजेत प्रिये;
दीपांमुळे लोकांवर विजय मिळवता येतो.दीप हे तेजोमय, धर्मार्थ, कामनादायी, मोक्षप्रद आहेत.म्हणून त्यासाठी दीप प्रज्ज्वलित करायला हवेत. यासाठी मातीच्या, धातूच्या दिव्याबरोबरच आपल्या अंतःकरणातल्या प्रेरणेचा, चैतन्याचा दीप जागृत करायचा, असा अंतःकरणातला दिवा प्रज्ज्वलित असेल तर संवेदना, भावना, विचार यांच्या शलाका म्हणजेच ज्योती तेजाळ होतील आणि मग तुम्ही इतरांच्या अंतःकरणावर विजय मिळवू शकाल.
चांगल्या वर्तनाचा प्रकाश स्वतःप्रमाणेच इतरांचंही आयुष्य उजळून टाकतो. आज माणसाचं मन अंधारात चाचपडतंय, त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय, त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा दिवा व्हायला हवंय.
दिवाळीतली अमावस्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचा उत्सव मानला जातो. घराघरातली स्त्री ही या लक्ष्मीचंच रूप. म्हणूनच तिला गृहलक्ष्मी म्हटलं आहे. स्त्रीच निरपेक्ष प्रेम करू शकते म्हणूनच तर ती वसुबारसेला गाई-गुरांना ओवाळते, त्यांच्यासाठी उदंड आयुष्य मागते. भाऊबीज म्हणजे भावा-बहिणीचं निर्मळ नातं. बहीण मनातल्या निरपेक्ष प्रेमाच्या लख्ख प्रकाशात भावाला प्रत्यक्षातल्या दीपानं औक्षण करते.औक्षण म्हणजे आयुष्यवर्धन.
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावे सकलाला, कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन् जग उजळो
दिव्याचं प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलंसं करून प्रत्येकाला समसमानच प्रकाश देते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येक जण स्वतःच्या चौकटीत असताना, आपल्या शैलीत बदल करता करता जीवन तर बदलत नाही ना, याकडे प्रत्येकानंच लक्ष द्यायला हवं. दिवाळीतल्या या दिव्यांकडून आपणही हेच शिकलं पाहिजे, की आपलं काम, स्वरूप कसंही असो; पण त्यातून जग उजळलं पाहिजे. हे जग उजळवताना फटाक्यांमुळे प्रदूषण तर होणार नाही ना, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. दिव्यांची रोषणाई जरूर करावी; पण विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवून विजेची बचतही करायला हवी.
दिवाळी, आसमंत उजळवून टाकणार्या प्रकाशाचा क्षण. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अंधार दूर करण्याचा सण. खरं तर अंधार म्हणजे सूर्यानं पाठ फिरवल्यावर मागे पडणारी सावली किंवा सूर्यास्तानंतर निर्माण होणारी काळ्या रंगाची अमर्याद पोकळी. आज अवतीभवती दिसणारी असुरक्षितता, भयभीत वातावरण, सुविधांचा अभाव, सर्वच क्षेत्रात पसरलेलं भ्रष्टाचाराचं जाळं, बेजबाबदार वागणं हे पाहिलं की मन अस्वस्थ होतं. स्त्री-शक्तीची पूजा बांधणार्या आपल्या या देशात, स्वतःच्या घरात स्त्रीला सुरक्षित वाटतं का, कोवळ्या वयात आत्महत्येचं धाडस पाहिलं की अंधाराची व्याप्ती दिवसेंदिवस फारच मोठी होत असल्याचं जाणवतं; कारण या सगळ्या गोष्टी एका अर्थानं अंधाराचंच रूपक आहेत. या सणाच्या निमित्तानं दिसणारा प्रकाशाचा लखलखाट आठवड्यापुरताच असतो. प्रश्न मात्र सुटत नाहीत. आज मोबाइलच्या जमान्यात क्षणात पोहचणार्या मेसेजमुळे शुभेच्छांची पत्रं आता कालबाह्य झालीत, मेसेज मिळाला, की लगेच रिप्लायमुळे वाट पाहण्यातली उत्सुकता, धडधडही आता हरवून गेली आहे, रेडिमेड मेसेज फॉरवर्ड करत आपणही फॉरवर्ड झालो; पण आपली मनं बॅकवर्ड झालीत. आजच्या विभागलेल्या जीवनशैलीत एकमेकांतील संवादाचे सूर धूसर होताना दिसतात. जगण्याचा कोर्स घरच्या चौकटीत राहून नाही करता येत, त्यासाठी प्रत्यक्ष जगण्यातच स्वतःला झोकून द्यावं लागतं, चारचौघांबरोबर, समाजाबरोबर संवादाच्या भिंती बांधाव्याच लागतात.
अंधार-प्रकाश, दुःख-सुख, तृष्णा-शांती, क्रोध-आनंद अशा कितीतरी द्वंद्वात माणूस आज जगताना दिसतोय.
मातीचा दिवा हो, कापसाची वात या म्हणीप्रमाणे पणतीतली वात तेवण्यासाठी, वात ही तेलात बुडालेली असावी लागते आणि त्याच वेळी तिचं एक टोक बाहेरही असावं लागतं. ती वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली, तर ती प्रकाश देऊ शकत नाही.
जीवन हे दिव्याच्या वातीप्रमाणे आहे, तुम्ही जगातल्या भौतिक गोष्टीमध्येच बुडून गेलात तर तुमच्या जीवनात आनंद आणि ज्ञान येऊ शकणार नाही. याच जगात राहूनसुध्दा भवसागरात न बुडता एक टोक बाहेर ठेवू शकला, तर आनंद आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्या जीवनात पडेल. मातीचा दिवा म्हणजे शरीर व तेलाची वात म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा प्रकाश हाच तो प्रकाश आपण आपल्या अंतर्आत्म्यात जागृत ठेवायचा आहे.
या दिवाळीच्या निमित्तानं आज खर्या अर्थाने मनं उजळायला हवीत. सध्याच्या ताणतणावाखाली आपण स्वतःलाच नीट पाहत नाही. या प्रकाशात स्वतःलाही पाहून घेऊ या. पैशाच्या मोहापायी कोणत्याही सिग्नलना न जुमानता सुसाट जाणं हे अयोग्यच आहे. आपण कुणाशी व का स्पर्धा करतोय? तेही या दिवाळीच्या प्रकाशात दिसतं का ते पाहा.
विवेकाचा उजेड मनामनात पेरण्यासाठी दीपावली ही तर आपल्यासाठी पर्वणीच. त्यासाठी आज आपण प्रतीकात्मक पद्धतीनं हा प्रकाशोत्सव साजरा करू यात.जिथे प्रकाश असेल तिथे तो जागता ठेवू, जिथे तो नसेल तिथे त्याला जाग आणू. तेजस्वी दिव्यांच्या लखलखाटात आपल्या सर्वांमध्ये सामावलेल्या शुभशक्तींना जागं होण्याचं आवाहन करू. अवघं जीवन प्रकाशमय करून दीपावलीतील या तेजस्वी जाणिवांनी आपली ज्योत उजळणं, हा अंतर्यामीचा खरा दीपोत्सव असेल.
वसुबारस (गोवत्सद्वादशी)
गुरुवार
दि.09/11/2023
अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )
वसुबारस-(अर्थात गोधनरुपी लक्ष्मीची पूजा)
गाईवासराचे सायंकाळी पूजन करावे
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजराकेला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशीगाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे याहेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशीपुरणाचा स्वयंपाक करतात.घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थवाढून गाईलाखाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.
ह्या दिवशी गहू, मूग खातनाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. यादिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्यामुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.काही ठिकाणी या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणाततुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजनकेले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्तहोते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठीहोणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्यागोष्टीलक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.
धनत्रयोदशी
शुक्रवार
दि 10/11/2023
गुरुद्वादशी ,धनत्रयोदशी-धन्वंरी जयंती
यमदीपदान
अपमृत्यू येऊ नये म्हणून, खालील मंत्रांनी यमाची प्रार्थना करून दीप पूजन करावे
यम प्रार्थना मंत्र
मृत्यूंना पाशदंडाभ्यां कालेन: श्याम यासह ।
त्रयोश्यां दीपदानत् सूर्यज: प्रियतां मम॥
दीर्घायुषीआरोग्य लाभावे म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते. (‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो.
देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.
नरक चतुर्दशी
रविवार
दि.12/11/2023
दीपावली,नरकचतुर्दशी,अभ्यंगस्नान -चंद्रोदयी अभ्यंग स्नान करावे.
चंद्रोदय-पहाटे 5. 33
अपमृत्यू येऊ नये म्हणून यमतर्पण करून यमाची प्रार्थना करावी
प्रार्थना मंत्र
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः ।
भूताधिपोऽदत्त कृतानुसारि कृतांत एतत् दशभिर्जपंती ॥
आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्यंगस्नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळते. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. अभ्यंगस्नानाच्या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्यामागची कल्पना आहे. अभ्यंगस्नान करणार्या व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या सर्वांगाला तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात. अभ्यंगस्नान झाल्यानंतर ओवाळणी केली जाते. त्यावेळी आरतीच्या ताटात कणकेचे दिवे पेटवले जातात. सोबत कणकेचे मुठीच्या आकाराचे गोळे तयार केले जातात. ते गोळे व्यक्तीला (नजर उतरवावी त्याप्रमाणे) ओवाळून चार दिशांना फेकले जातात.
नरक चतुर्दशीसंबंधी पौराणिक कथा आहे,ती अशी –
प्राग्ज्योतिषपुराचा राजा नरकासूर याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाल्यामुळे तो फार बलाढ्य झाला व देवादिकांना पीडा देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत हत्ती व घोडाही हरण केला. त्याशिवाय त्याने अनेक राजांच्या एकूण सोळा हजार कन्या धरून आणून त्याच्या बंदिखान्यात ठेवल्या. काही राजांनाही कारागृहात डांबले. त्याने अगणित संपत्ती लुटली. सोबत इंद्राचे अमर पर्वतावरील मणिसंज्ञक स्थान, इंद्रमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले.त्याच्या त्या अत्याचाराने लोक गांजले. मग इंद्राने कृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने नरकासुराचा अंत करण्याचे मान्य केले. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर नरकासूराची राजधानी होती. ती राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खंदक, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. कृष्णाने गरूडावर स्वार होऊन प्राग्ज्योतिषपूरावर स्वारी केली. त्याने नरकासूराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याला ठार मारले व बंदिखान्यातील सर्वांना मुक्त केले. नरकासूराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने त्या सोळा हजार कुमारिकांशी विवाह केला. नरकासुर मृत झालेला पाहिल्यावर त्याची आई पृथ्वीमाता भूमिदेवी पुढे आली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. आणि रत्नांनी चमकणारी दोन कुंडले, वैजयन्तीमाला वरुणाचे छत्र, महारत्न या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्या. याच वेळी भूमीमातेने कृष्णाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली, की नरकासुराचा ‘भगदत्त’ नावाचा मुलगा आहे. त्याला तू संभाळ. श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले. ती गोष्ट आश्विन वद्य चतुर्दशीस घडली. नरकासुराने मृत्यूपूर्वी कृष्णाकडे वर मागितला, की ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली. लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान व आनंदोत्सव करू लागले.
महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर घरातील सर्व केरकचरा ओततात. त्या ढिगावर (पूर्वी एक पैसा) रुपया ठेवतात. जो अंत्यज मनुष्य ते सर्व उचलून नेतो त्याला बक्षिसी देतात. नरकासुरवधाच्या स्मरणार्थ काही ठिकाणी आंघोळीपूर्वी डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीटठेचले जाते. ते नरकासुरास मारण्याचे प्रतीक मानले जाते. काही ठिकाणी त्याचा रस जीभेला लावण्याचीही चाल आहे. कारीट ठेचल्यानंतर अभ्यंगस्नान केले जाते. अमावास्येला नवी केरसुणी विकत घेतात, तिला लक्ष्मी म्हणतात; कारण ती अलक्ष्मीला झाडून टाकण्याचे काम करते.
नरकचतुर्दशी हे एक काम्यव्रत (धन, पुत्र, सौभाग्य, ऐश्वर्य, सत्ता इत्यादी कामना मनात धरून केली जाणारी व्रते) आहे. त्या दिवशी सूर्योदयापूर्वी यथाविधी स्नान करतात आणि आह्निके झाल्यानंतर नक्तव्रताचा संकल् करतात.दिवसभर उपवास करून रात्री भोजन करणे याला नक्तव्रत म्हणतात.त्याचे दुसरे नाव ‘दिवारात्रीव्रत’ असेही आहे.सायंकाळी नरकासूराच्या उद्देशाने चार वातींचा दिवा लावतात आणि पुढील मंत्र म्हटला जातो –
अग्निर्ज्योती रविर्ज्योतिश्चन्द्रो ज्योतिस्तथैव च ।
सर्वेषां ज्योतिषां श्रेष्ठो दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
अर्थ – अग्नी,रवी,चंद्र इत्यादी सर्व दिव्य ज्योतींहून श्रेष्ठ असलेल्या दीपाचा (हे देव हो, तुम्ही) स्वीकार करावा.
हा मंत्र म्हणून देवालये, वाडा, तट, उद्यान, वापी, रस्ता, घोड्यांची पागा वगैरे ठिकाणी दिवे लावतात. नंतर गवताची किंवा अन्य कशाची चूड पेटवून पुढील मंत्र म्हणतात –
अग्निदग्धाश्च ये जीवा येऽप्यदग्धा: कुले मम ।
उज्ज्वलज्योतिषा दग्धास्ते यान्तु परमां गतिम् ॥
अर्थ – माझ्या कुलात जे अग्नीने अथवा उज्ज्वल ज्योतीने दग्ध होऊन मरण पावले असतील ते आणि जे मेल्यावर दग्ध झाले नसतील तेसुद्धा सर्व (या चुडीच्या प्रकाशाने) परमगतीला जावोत.
शेवटी शैव ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देऊन, व्रतकर्त्याने स्वत: उडदाच्या पानांच्या भाजीने युक्त असे नक्तभोजन करायचे असते.
नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून, उष्णोदकाने अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने अंगावर प्रोक्षण करणे, स्नानानंतर यमराजाला वंदन करून जलांजली अर्पण करणे; दुपारी ब्राह्मणभोजन व वस्त्रदान करणे; प्रदोषकाळी दीपदान, शिवपूजा, महाशिवरात्रीपूजा करून नक्तभोजन करणे असा त्या व्रताचा विधी आहे. काही लोक त्या दिवशी पितृतर्पणही करतात.
आश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी असेही म्हणतात. त्या दिवशी लवकर स्नान करून स्त्री-पुरुष विशेष साज-शृंगार करतात. मात्र त्या रात्री भुते-खेते सर्वत्र संचार करतात अशी समजूत असल्यामुळे लोक सामान्यपणे रात्री घराबाहेर जात नाहीत. त्या रात्रीला काळरात्र म्हणतात. बरेच लोक त्या रात्री शेंदूर व तेल लावून हनुमानाची पूजा करतात व नारळ फोडतात. काही धाडसी साधक त्या रात्री स्मशानात जाऊन मंत्रसाधना करतात.
लक्ष्मीपूजन कथा-विधी
लक्ष्मी-कुबेर पूजन
दुपारी 01.45 ते 03.10
सायंकाळी 06ते 08.50
रात्री -08.50 ते 11.00
शक्यतो सायंकाळी करावे.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन अमावस्येला संध्याकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते.यावेळी केरसुणीची देखील पूजा करण्यात येते.लक्ष्मी देवीला स्वच्छतेची आवड असते त्यामुळे परिसर हा स्वच्छ केल्यानंतर सायंकाळी पूजा केली जाते. लक्ष्मी देवी आज आपल्या स्वच्छ घराला भेट देणार आहे त्यासाठी घरांना विशेष रोषणाई करीत तिला आमंत्रित केले जाते.तिच्या येण्याचा मार्ग उजळेल असे मानले जाते. घरातील सोन्याचेदागिने, नाणं-नोटा एकंदर आर्थिक व्यवहारातील वस्तूंची यादिवशी पूजा करतात. व्यापारी त्याच्या सर्व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतो. हिंदू शास्त्रानुसार लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्न असलेल्या ठिकाणी करतात, त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचेनवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.या दिवशीदेखील परिवारातील सर्व सदस्य अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढतात. त्या सोबत सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात, तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो.
एक प्राचीन कथा आपणास माहीत असेल की,पूर्वी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती.कुबेर हा शिवाचा खजीनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजा करणे हा मुळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पुजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या होत्या.त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दिसतात.तर काही मध्ये कुबेर त्याची पत्नी इरीतीसह दाखविण्यात आला आहे.यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरीती यांची पूजा केली जात असावी.कालांतराने इरीतीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.
लक्ष्मी पूजन करतांना खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा, पाहा
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।
ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।
ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
मंगळवार
दि.14/11/2023
दिवाळी पाडवा,बलिप्रतिपदा,
साडेतीन मुहूर्तातील एक दिवस ,
वही आणि गोवर्धन पूजनाचा
आपल्या पतीला ओवाळून -पतीकडून ओवाळणी घ्यायचा दिवस
वहीपूजन मुहूर्त
मंगळवारी
पहाटे -02.30 ते 05.30
सकाळी -06.45 ते 7.35
सकाळी -10.55 ते दु .01.45
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो.दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला गेला आहे.
पुराणकथेनुसार,प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला.त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदी केले.मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली.बळीने ती मान्य केली.वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला.तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारताच बळीने त्याचे स्वत:चे मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव असे वामनाला सांगितले.वामनाने बळीच्या मस्तकी पाय ठेवून त्याला पाताळात ढकलले.ते सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडले.नंतर वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘देवा, केवळ लोककल्याणासाठी मी एक वर मागतो.या तीन दिवसांत जो कोणी यमाप्रीत्यर्थ दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य असावे.’त्यावर वामनाने ‘तथास्तु’ म्हटले.तेव्हापासून या दिवसांत दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली.कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीचा दिवस मानून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव करू लागले.बळीराजा देवांचा शत्रू असला, तरी तो दुष्ट नव्हता.अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता याविषयी त्याची ख्याती होती.त्याचे राज्य हे सुराज्य होते.म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे अशी आकांक्षा वरील लोकाचारांत प्रकट झालेली दिसते. म्हणूनच ‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्या शिंगांना रंग लावून व त्यांच्या गळ्यात माळा घालून त्यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.पूर्वी, बलिप्रतिपदेच्या पहाटे घरातील एखादी व्यक्तीे सर्व घर झाडून स्वच्छ करी. मग सगळा केर एका टोपलीत जमा करून त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पैसा-सुपारी ठेवण्यात येई. ती टोपली घरातील प्रत्येक खोलीपुढे ओवाळली जाई.त्या वेळी ती व्यक्ती ‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो.’ असे मागणे मागत असे.मग एक स्त्री सूप वाजवत त्या व्यक्तीच्या मागोमाग दरवाजापर्यंत जात असे.पुढे चालणारी व्यक्ती मागे न पाहता घराबाहेर जाऊन सर्व केर रस्त्याच्या कडेला टाकी.नंतर ती व्यक्ती घरात येऊन कोणालाही न शिवता अंगाला तेल लावून गरम पाण्याने स्नान करत असे.
या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करतात.मग ते एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवतात.डोक्यावर घोंगडी घेतात आणि शेतात जातात.ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.नवविवाहित दांपत्य हा दिवस पत्नीच्या माहेरी साजरा करतात.त्याचा उल्लेख दिवाळसण असा केला जातो.यानिमित्ताने जावयाला आहेर दिला जातो.बळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो ।
भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ॥
अर्थ – हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.त्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवताचा वर्षारंभदिन मानला जातो. त्या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया त्यांच्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात.दिवाळीतील हाच दिवस प्रमुख समजला जातो. त्या दिवशी लोक नवी वस्त्राभरणे लेऊन दिवस आनंदात घालवतात. त्या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे.पार्वतीने शंकराला त्याच दिवशी द्यूतात हरवले होते.त्यावरून या प्रतिपदेला ‘द्यूतप्रतिपदा’ असेही नाव मिळाले आहे. या तिथीला द्यूत खेळण्याचे विधान धर्मशास्त्राने सांगितले आहे.या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून अत्यंत लक्षपूर्वक द्यूतक्रीडा करावी.त्यामुळे पुढील वर्ष बरेवाईट कसे जाईल त्याची ठीक कल्पना येते, असे शास्त्रवचन आहे. त्या विषयीची एक कथा अशी आहे –
एकदा बलिप्रतिपदेच्या दिवशी शंकराने पार्वतीसह द्यूत खेळायला प्रारंभ केला.शंकर त्या खेळात सर्वस्व हरला आणि वल्कले परिधान करून गंगातीरी जाण्यासाठी घराबाहेर पडला.कार्तिकेयला हे समजल्यावर त्याने त्याच्या पित्याकडून द्यूत शिकून घेतले आणि पार्वतीबरोबर द्यूत खेळून शंकराने पणात हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या व त्या शंकराला नेऊन दिल्या.त्यानंतर गणेशाने शंकर व कार्तिकेय यांच्याबरोबर द्यूत खेळून त्या वस्तू पुनश्च जिंकल्या व आईला नेऊन दिल्या.अशा प्रकारे पुन:श्च सर्वस्व हरल्यावर शंकर हरिद्वार येथे गेला. तेथे त्याने विष्णूच्या सूचनेवरून त्र्यक्षविद्या (तीन फाशांची विद्या) निर्माण केली. त्या तीन फाशांपैकी एका फाशाचे रूप साक्षात विष्णूनेच धारण केले होते. ही नवी द्यूतविद्या घेऊन शंकर घरी गेला आणि त्याने पार्वतीला खेळात हरवले.शिव-पार्वतींच्या या द्यूतक्रीडेची स्मृती म्हणून या दिवशी द्यूत खेळण्याची प्रथा पडली.बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा- फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिकमासातील सर्व कृत्ये निष्फल होतात, असे सांगितले आहे.पूर्वी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत. या प्रथेच्या पालनातून सामाजिक एकात्मता, बंधुभाव वाढीस लागावा असा या सोहळ्यामागील उद्देश होता.ठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा किंवा तांदळाच्या पिठाचा बळीराजा काढून त्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी त्या आकृतीजवळच कडू जिरे, झेंडू किंवा अंबाडीचे झाड लावतात.राजस्थांनात प्रतिपदेला ‘खेंखरा’ असे म्हणतात.त्या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकूट करतात.सायंकाळी बैलांची पूजा करतात. महाराष्ट्रातील बैल-पोळा सणाप्रमाणेच तो सण असतो.त्यात बैलांच्या टकरीही लावतात.बैलांना घेऊन गाणी म्हणत शेतकरी घरोघर जातात.त्याच दिवशी नाथद्वारा येथे मिष्टान्नाचा प्रचंड अन्नकूट करून तो गरीब लोकांकडून लुटवण्याची प्रथा आहे.‘खेंखरा’च्या दुसर्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते. नवीन वर्षासाठी नवीन वह्यांत जमाखर्च मांडण्यास प्रारंभ करतात.केरळमधील ‘ओणम’ हा उत्सव आश्विनमासात बळीच्या स्मरणार्थच साजरा होतो.
भाऊबीज
बुधवार
दि.15/11/2023
भाऊबीज (यमद्वितिया )
बहिणीतील अतुट नातं वृद्धिंगत करण्याचा दिवस .
बहिण आपल्या भावाला ओवाळते.
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया.द्वितीयेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.तेव्हा बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण.बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील,तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो.
भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी. बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा.
घराची,दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही…तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते.वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते.आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.
दसरा-दिवाळीत तर काय करू आणि काय नको? असं होऊन जातं.दरवाजाच्या चौकटीपासून ते रांगोळीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या मनाला हव्या तशा सजवण्यात आपला किती वेळ खर्ची जात असेल ना! पण, हे सगळं करून स्वत:ला आणि आपल्या कुटुंबीयांना खूश करण्यातला आनंद काही औरच…दिवाळी आहे आणि आपल्या घराचा दरवाजा रांगोळीनं सजला नाही, असं तर होणंच शक्य नाही.पण,तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की आपल्या सणांच्या दिवसात रांगोळीचं एवढं महत्त्व का आहे?
तसं पाहायला गेलं तर भारतातील प्रत्येक सणांत आणि त्यांच्या परंपरेमध्ये एक गर्भित अर्थ आहे.तसंच रांगोळीचंदेखील आहे…पण, घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही…तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात.त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.
रांगोळी म्हणजे भूमी-अलंकरण…भूमीला सजविण्यासाठी, देवघरातील देव्हारा, अंगण, भोजनाची पंगत, शुभकार्यस्थळ इत्यादी जागा सुशोभित करण्यासाठी रांगोळी, तांदळाची पिठी, खडू, शिरगोळ्याचे किंवा संगमरवराचा भुकटी, चुन्याची भुकटी, भाताच्या तुसाची जाळून केलेली राख, मीठ, पानं, विविध धान्ये अशा विविध गोष्टींनी रांगोळी काढली जाते. आणि त्यात वेगवेगळे रंग भरून ती सुशोभित केली जाते. आपल्या जीवनही अशाच वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं असावं, ही त्यामागची इच्छा आणि मागणी. धार्मिक, सांस्कृतिक समारंभ प्रसंगी, शुभकार्य प्रसंगी घरासमोर, अंगणात, उंबर्यावर, देवघरासमोर, चौरंग वा पाटाभोवती रांगोळी रेखाटली जाते. पूजापाठ, यज्ञ, अभ्यंगस्नान, औक्षण, नामकरण, भोजन अशा सर्व प्रसंगी सर्वप्रथम रांगोळी काढणे भारतात सर्वत्र प्रचलित आहे.आता समजलं का…सणांच्या दिवसांत रांगोळी का महत्त्वाची आहे ते…मग, आता जेव्हा तुम्ही या दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर बसून रांगोळी रेखाटत असाल तेव्हा हे लक्षात असू द्या की तुम्ही फक्त घराची सजावट करत नाही तर तुम्ही तुमच्या संपूर्ण घराला आणि कुटुंबीयांना एका सकारात्मक ऊर्जेमध्ये घेऊन जाताय. शिवाय यासाठी तुम्ही रासायनिक रंगांचा वापर न करता प्राकृतिक रंगांचा जेवढा जास्त वापर कराल तेवढं चांगलं…कारण हे रासायनिक रंग तुमच्या त्वचेला हानिकारकही असतात.
तुळशी विवाह
तुलसी विवाह : शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023
त्रिपुरारी पौर्णिमेच्या तीन दिवस आधी म्हणजे द्वादशीच्या तिथीला तुळशी विवाह केला जातो. दरवर्षी तुळशी विवाह का करायचा आणि तुळशी विवाह करणं, हे कशाचं प्रतीक आहे. तुळशी विवाहाची तिथी द्वादशीलाच का असते, यामागे पौराणिक संदर्भ काय ते पाहू या.
तुळशी विवाहाची कथा
प्राचीन कथेनुसार जालंधर नामक एका राक्षसाने मोठा उच्छाद मांडला होता. तो खूप मोठा पराक्रमी होता. त्याच्या वीरतेचे कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा. कारण ती निष्ठावान पतिव्रता होती. त्यामुळे त्याला सर्वत्र जय मिळत होता. जालंधराच्या या उच्छादाने हैराण असलेल्या देवगणांनी आणि ब्राह्मणांनी श्रीविष्णूंकडे धाव घेतली आणि भगवान विष्णूंकडे या राक्षसापासून मुक्तता मिळावी, म्हणून गार्हाणे घातले. त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी शेषशयन सोडून पाताळात धाव घेतली आणि वृंदाचा पतिव्रता धर्म भंग करण्यासाठी त्यांनी अनेक सायास केले. जालंधर हा देवांबरोबर लढत असताना, त्याच्या पत्नीचे सात्त्विकता कमी झाल्यामुळे त्याला युद्धभूमीवर मरण आले.वृंदाचे पतिव्रतेचे सात्त्विकता कमी झाल्यामुळे त्याला मरण आले होते, असा समज तिचा झाला. तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला पण स्वत:ला संपवू शकली नाही. शेवटी तिला समजले की, आपल्या पतिव्रतेच्या सात्त्विकतेमुळे नाही तर भगवान विष्णूने तिचं पावित्र्य भंग केल्यामुळे त्याला मरण पत्कारावे लागले. तेव्हा ती भयंकर क्रोधित झाली. तिने श्रीविष्णूला शाप दिला आणि ती म्हणाली, ‘ज्याप्रकारे तू माझ्यापासून माझ्या पतीला हिरावून घेतलं आहेस, त्याप्रमाणे तुलादेखील पत्नीवियोग होईल आणि तुला ही मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल.’ असं म्हणून ती पतीच्या चितेत सती गेली. ज्याठिकाणी ती सती गेली होती, त्याठिकाणीच तिच्या सात्त्विकतेचं प्रतीक म्हणून एक तुळशीचं रोप उगवलं.यामागे अजून कथा सांगितली जाते ती म्हणजे, जेव्हा ती श्रीविष्णूंना म्हणाली की, ‘तुलाही पत्नीवियोग होईल आणि तुला मृत्यूलोकात दगड व्हावे लागेल.’ तेव्हा भगवान विष्णूंनी तिला अतिशय चलाखीने मनवले आणि सांगितले की, ‘मला तुझ्या सत्त्वाची परीक्षा घ्यायची नव्हती तर हे तुझ्या सतित्वाचं फळ आहे की, कलियुगात माझा तुझ्याशी विवाह होईल.’ कलियुगात जो मनुष्य तुळशी विवाह करेल त्याला परमधाम प्राप्त होईल, असाही वर विष्णूंनी दिला होता. त्यामुळे भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीदलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तुळशी विवाहामुळे ज्या लोकांना कन्या नाही, त्यांना कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते असा समज आहे. शापित विष्णू भगवानांचा या दिवशी महालक्ष्मी देवींशी विवाह होतो, असा समज असल्यामुळे लोक तुळशी विवाह करतात. आजकाल मुलींची संख्या कालानुरूप लोप पावत चालली आहे, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने का होईना, लोक कन्यादानाचे पुण्य मिळवत आहेत. खरं तर महिलेशिवाय जगाची निर्मिती नाही, पण आज त्याचं जगाची निर्मिती करणार्या ‘स्त्री’चं अस्तित्व मात्र संपुष्टात येऊ लागलं आहे. त्यामुळे तुळशी विवाहासोबतच मुलींचीही जडण-घडण उत्तम होणं, मुळात त्यांचा जन्म घेण्याचा हक्क त्यांच्यापासून हिरावून न घेणं आणि त्यांना उत्तम शिक्षण देणं अत्यावश्यक आहे. पूर्वीपासून स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आलं आहे, हे कुठं तरी थांबायला हवं, म्हणून ही सणावारांची चंगळ होती. पण आता सणवार का करतात, हेही येणार्या नव्या पिढयांना माहीत नाही.
दिवाळीतील ‘अभ्यंग स्नान’
दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटेचे स्नान शुभ मानल्या जाते. अशी मान्यता आहे कि सूर्योदयाच्या आधी स्नान करणे म्हणजेच गंगे मध्ये स्नान करने, हे स्नान गंगा नदीत केलेल्या अंघोळीइतकेच पुण्य आपल्याला मिळवून देते.
या प्रकारे करावे अभ्यंगस्नान:
आपल्या शरीराची तिळाच्या तेलाने मालिश करावी.
मालिश केल्यानंतर व अभ्यंग स्नान करण्यापूर्वी 30 मिनिटांकरिता वाट पहावी. यामुळे तेल आपल्या शरीरात संपूर्ण जिरून जाईल.
स्नानाच्या वेळी आपल्या पूर्ण शरीरावर उटणे लावून चांगल्याप्रकारे घासून घ्यावे.
उटणे वाळल्यानंतर पाण्याच्या सहाय्याने ते काढून घ्यावे.
भरपूर लोक उटणे लावल्यानंतर साबणाचा वापर करत नाही, परंतु आपल्याला हवे असेल तर आपण साबणाचा वापर करू शकता.
सुगंधी उटणे:
दिवाळी मध्ये उटण्याचे महत्व खूप जास्त आहे. उटण्याने आपली शरीराची कांती उजळून छान दिसते, तसेच त्वचा मुलायम देखील राहते. आपला चेहरा स्वच्छ होतो, अंगाला चांगला सुगंध येतो, शरीराची मृत त्वचा ताजी होते.
घरगुती उटणे बनवण्याची कृती:
250 ग्राम -मसूर डाळ, 25 ग्राम- सरिवा, 25 ग्राम- वाळा, 25 ग्राम – नागर मोथा, 25 ग्राम -जेष्ठमध, 25 ग्राम -सुगंधी कचोरा
25 ग्राम -आंबेहळद, 25 ग्राम -तुलसी पावडर, 25 ग्राम -मजीस्ट, 5 ग्राम -कापूर, या संपूर्ण सामग्रीला एकत्र करून तुम्ही घरगुती सुगंधी उटणे तयार करू शकता.
दिवाळीत किल्ले उभारण्याची परंपरा
दिवाळी म्हटलं की आठवडतात ते मातीचे किल्ले.शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, मुलं एकत्र जमून किल्ला बनवण्यासाठी सारा खटाटोप करतात. हा किल्ला बनवताना प्रत्येकाचा उत्साह आणि त्यांच्या कल्पकतेला अधिक वाव दिला जातो.किल्ला बांधणे म्हणजे स्वतःच्या मन आणि बुद्धी यांवर ईश्वराच्या शक्तीचे तेज निर्माण होणे.म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करू शकतो.
घर हे समृद्धी-दर्शकतेचे प्रतीक असते.घरासमोर किल्ल्याची निर्मिती केल्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी, म्हणजेच घरात असलेल्या धनसमृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपतीशिवाजी महाराजांच्या क्षात्रतेजाचे प्रतिनिधीत्व करणार्या,किल्ल्याचे नेतृत्व असलेल्या धर्माचरणी राजाशी अभेदता निर्माण करते.
दिवाळीतील किल्ल्याचा इतिहास
किल्ले बनवण्याची परंपरा जरी पूर्वीपासून तशीच चालत आली असली तरीही आज किल्ले बनविण्याच्या पद्धतींमधे पुष्कळ बदल झाले आहेत.बदलत्या काळासोबतच पारंपारिक पद्धतींना आधुनिकतेची जोड़ लागली आहे.म्हणजेच पूर्वी ज्याप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकामधील चित्रानुसार बनवले जाणारे किल्ले आता कंप्यूटर आणि मोबाइल मधे ऑनलाइन चित्रे पाहून बनविली जातात.
लहान मुलांमधे किल्ले बनविण्याचे मुख्य कारण म्हणजे किल्ल्यांबद्दलची त्यांची कुतूहलता आणि आकर्षण. दिवाली निमित्त नविन कपडे , फटके, फराळ या सर्वांमधे दांग असणारी मुलं किल्ले-बांधणीच्या स्पर्धांमुळे स्वतः किल्ले बनविण्यात दंग आहेत अशी चित्र जागो-जागी बघायला मिळाली.लहान मुलांना किल्ले बनविण्याच्या आपल्या संस्कृतीचा इतिहास जपण्यासाठी पालकांनी,कुटुंबीयांनी पुढाकार घेवून मुलांना उत्तेजन द्यायला हवे.
सार्वजनिक मंडळ,सेवाभावी संस्था,राजकीय पक्ष तर अश्या प्रकारचे किल्ले बांधणी उपक्रम प्रत्तेक वर्षी राबवत असतात.आपल्या मुलांना आवर्जून अश्या प्रकारच्या स्पर्धांमधे भाग घ्यायला लावणे एवढे कर्तव्य तरी पालकांनी करायला हवे.लहान मुलांना अश्या प्रकारचे प्रोत्साहन पुढे घेऊन जाते.शिवाय आता किल्ले बनविण्यासाठी बाजारात अनेक साहित्य उपलब्ध झाले आहेत
आकाश कंदिल
हा दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे.आश्विन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्याला आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधीपुढीलप्रमाणे असतो. घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी.तीवर चंदनयुक्तत जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे. मध्यभागी वीस हात,नऊ हात किंवा पाच हात लांबीचा खांब पुरावा. तो वस्त्र, पताका,अष्टघंटा,कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृति दीप (कंदिल) करून अडकवावा. त्या दीपात(कंदिलात) मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूति, दामोदर, धर्मराज,प्रजापति,पितर(तम:स्थित) व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामोदराय नभसि तुलायां लोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ॥
अर्थ : श्रेष्ठ असा परमेश्वधर जो दामोदर,त्याला हा ज्योतीसह दीप अर्पण करतो.त्याने माझे कल्याण करावे. याचे फल लक्ष्मीप्राप्तिच हे आहे.
देवांची दिवाळी
देव दिवाळी : बुधवार, 13 डिसेंबर 2023
दिवाळी सणाइतक्याच हर्षोल्हासात साजरा होणारा कार्तिक पौर्णिमेचा, त्रिपुरारी पौर्णिमेचा, देवदिवाळीचा सण म्हणजे दिवाळ सणाचा उत्तरार्धच.पण त्रिपुरारी पौर्णिमा आणि ‘देवदिवाळी’ एकाच दिवशी साजरी का करतात, द्वादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह का केला जातो, याचे पुराणातील संदर्भ आणि देवदिवाळी यांचा परस्परांशी संबध आहे.
दिवाळीचे पाच दिवस संपले की, सर्वसामान्यपणे दिवाळी संपते, पण दिवाळी ही केवळ पाच दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. कार्तिक महिन्यात शिवशंकर आणि देवी पार्वतीचे पुत्र कार्तिकेय यांचा देखील जन्म झाला होता. त्यामुळे या मासाला शंकर भगवानांनी ‘कार्तिक मास’ असे नाव दिले.
कार्तिक महिन्यात कार्तिक पंचमी ते पौर्णिमेदरम्यान जो कोणी स्वामी कार्तिकेय महाराजांची भक्ती करतो, त्याची भक्ती कार्तिक स्वामींपर्यंत पोहोचते, असा समज आहे. याच महिन्यात असणार्या दिवाळी या सणाची आपण माहिती घेतली, पण देवदिवाळी कशाला म्हणतात, ‘त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व, शीख धर्मगुरू गुरू नानक साहेब आणि कार्तिकेय यांच्या जन्मकथेची माहिती आपण जाणून घेऊ या.
त्रिपुरारी पौर्णिमा
कार्तिक मासात येणार्या पौर्णिमेच्या तिथीला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असंही संबोधलं जाते. या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराची कथा सांगायची तर, त्रिपुरासुर हा राक्षसांचा राजा तारकासूर याच्या तीन मुलांपैकी एक. या त्रिपुरासुराने पाताळ, पृथ्वी, आणि आकाश लोकामध्ये धुमाकूळ घातला होता.तिन्ही लोकांवर राज्य केल्यामुळे त्याला त्रिपुरासुर हे नामाभिधान प्राप्त झाले. त्रिपुरासुर हा ब्रह्मदेवांचा भक्त होता. त्याने बारा वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने अनोखा वर मागितला. ज्यामुळे भूतलावर त्याचा कोणीही वध करू शकत नव्हते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. यज्ञ याग बंद झाले.देवांना स्वर्गातही स्वछंद फिरण्याची भीती वाटू लागली. त्रिपुरासुराच्या कचाटयात सर्व देव सापडले होते. पण विष्णू भगवान आणि शिवशंकर देवांना हात लावण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. त्रिपुरासुराचा उच्छाद कोणीही थांबवू शकत नव्हतं. त्यामुळे तो मनाला येईल, तसं तसं वागत होता. मग शंकर भगवानांनी त्याचा वध करायचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्मरूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला.पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे शंकर भगवानांना ‘त्रिपुरांटका’ असे नामाभिधान प्राप्त झाले तर या कार्तिक पौर्णिमेला या उच्छाद करणार्या राक्षसाचा वध झाला त्यामुळे अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो.
देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध
त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता, त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्यामुळे त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला या जाचातून मोकळा श्वास सोडला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस ‘देवदिवाळी’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी देवदिवाळी साजरी केली जाते.त्रिपुरासुराचा वध हे केवळ एक निमित्त होतं, पण त्यांच्या नावामुळे देवांनाही दिवाळी काय असते, ते समजले. याचदिवशी श्रीविष्णूचा विवाहदेखील झाला होता, असा समज असल्यामुळे ही या तिथीला ‘देवदिवाळी’ असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.