स्वाभिमानीचे कार्यकर्ते व कारखान्याचे अधिकारी यांच्यात वादावादी
सांगली । उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) तिसऱ्या दिवशी आक्रमक होत काही ठिकाणी ऊस तोंडी बंद पडल्या.हुतात्मा,राजारामबापू व कृष्णा कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली.काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या टायरची हवा सोडली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्याचे अधिकारी यांच्यात वादावादीही झाली.दरम्यान,संघटनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता बघता यापुढील काळात ऊस दर आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
हुतात्मा किसन अहिर वाळवा,यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व राजारामबापू कारखान्याकडे आज दुपारी (गुरुवारी) जाणारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर,बैलगाडी रोखले.तर त्यातील सुमारे 20 ते 25 बैलगाडी व 15 ट्रॅक्टरची हवा सोडली.स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नवेखेड.जुनेखेड,पुणदी येथे हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना व राजारामबापु सहकारी साखर कारखान्याकडे तसेच नरसिंहपुर,बोरगाव, किल्लेमच्छिद्रगड,लवणमाची रस्त्यावर कृष्णा कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या काही ट्रॅक्टर मधील हवा सोडण्यात आली.रेठरेहरणाक्ष गावातील हार्वेस्टिंग मशिन बंद करण्यास भाग पाडले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यात वादावादी झाली. उद्यापासून ऊस तोंडी बंद करतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी सांगितले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पोपट मोरे,भागवत जाधव,जगन्नाथ भोसले,आप्पासाहेब पाटील,प्रकाश देसाई,धैर्यशील पाटील.प्रविण पाटील, प्रभाकर पाटील,तानाजी साठे,पंडित सपकाळ , अनिल करळे,विलास पाटील, शहाजी पाटील,प्रताप पाटील, प्रदीप पाटील, काशिनाथ निंबाळकर,शामराव जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले,माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणासाठी पदयात्रा तात्पुरती स्थगित केली आहे.याचा अर्थ ऊस आंदोलन बंद असे नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे.यंदा कमी पाऊसमान असल्याने साखर कारखाने 80 ते 85 दिवस चालणार आहेत.शेतकऱ्यांनी थोडी दिवस कळ सोसावी यंदा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देऊ.